कांदा उत्पादकांना गंडविणारा अखेर गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

धुळे - कुसुंब्यासह परिसरातील सुमारे 67 शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून पैसे न देता पोबारा करणाऱ्या बंगळूर येथील व्यापाऱ्याला तीन दिवसांच्या आतच चांदवड (ता. नाशिक) येथून पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या कांद्याची किंमत सुरवातीला एक कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात येत होते. शेतकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवीत त्याला गजाआड केले आहे. 

धुळे - कुसुंब्यासह परिसरातील सुमारे 67 शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून पैसे न देता पोबारा करणाऱ्या बंगळूर येथील व्यापाऱ्याला तीन दिवसांच्या आतच चांदवड (ता. नाशिक) येथून पोलिसांनी अटक केली आहे.  याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या कांद्याची किंमत सुरवातीला एक कोटीच्या घरात असल्याचे सांगण्यात येत होते. शेतकऱ्यांनी एकत्र येत पोलिसांकडे दाद मागितल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवीत त्याला गजाआड केले आहे. 

धुळे तालुक्‍यातील लोहगड, लोणखेडी, चौगाव, कुसुंबा येथील 67 शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा अफसर खॉं शब्बीर खॉं पठाण (रा. 80 बी. जी. रोड, शानभोग हडल्ली ता. आनेकल जि. बंगळूर, कर्नाटक) व महंमद सरवर (रा. बंगळूर) यांनी नियोजनबद्धरीत्या कट कारस्थान रचून कमी भावात खरेदी केला. अफसर हा पत्नीसह कुसूंब्यातील आदर्श कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने कांदा खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे न देता सामान घेऊन मोटार सायकलसह गावातून गाशा गुंडाळला. शेतकरी मात्र पैशांसाठी त्याचा तपास करीत होते, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी राष्ट्रवादीचे किरण शिंदे, किरण पाटील यांच्यामार्फत पोलिसांकडे कैफियत मांडली. 

फसवणुकीचे हे प्रकरण गंभीर असल्याने व शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा असल्याने त्यांची तत्काळ दखल घेत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांनी व्यापाऱ्यांचा शोध सुरू केला. आज (ता. 8) सकाळी अफसर हा चांदवड येथे आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वसावे यांनी पथक तेथे पाठविले. पथकाने अफसरला चांदवड येथून अटक केली. पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. के. वळवी, उपनिरीक्षक वाय.आर. जाधव, सी. टी. सैंदाणे, हवालदार प्रकाश मोहने, सतीश कोठावदे, सचिन माळी, राकेश सूर्यवंशी यांचा समावेश होता. 

67 शेतकऱ्यांची 30 लाखात फसवणूक 
फसवणुकीबाबत शेतकरी मनोज दिलीप पाटील (32 रा. लोहगड ता. धुळे) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यासह 67 शेतकऱ्यांची एकूण 30 लाख 67 हजार 414 रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी अफसर पठाण, महंमद सरवर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अशी केली फसवणूक 
अफसर हा काही महिन्यापासून पत्नीसह कुसुंबा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. कुटुंबासह जवळील गावातील शेतकऱ्यांकडून तो कांदा खरेदी करून तो त्यांच्या साथीदार महंमद सरवर याच्याकडे बंगळूर येथे पाठवीत होता. त्यानंतर पैसेही देत होता. विश्‍वास संपादन झाल्यानंतर त्याने 67 शेतकऱ्यांकडून मे ते जुलै महिन्यादरम्यान 430 ते 530 रुपये प्रती क्‍विंटल या भावाप्रमाणे कांदा खरेदी केला. त्यात काहींचे थोडेफार पैसे दिले आणि एक दिवस गाशा गुंडाळून पसार झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. 

या शेतकऱ्यांची झाली फसवणूक 
लोहगड येथील ब्रिजलाल पाटील, प्रकाश पाटील, सतीश चौधरी, भटू पाटील, दिलीप पाटील, काशिनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, सलीम पटेल, अनिल पाटील, व्यंकटराव पाटील, श्‍यामराव पाटील, विकास पाटील, अरमान पटेल, सरवर पटेल, मनोज पाटील, शरद पाटील, लोणखेडी येथील साहेबराव पाटील, हिंमत माळी, राजेंद्र ठाकरे, रामचंद्र ठाकरे, बिपिनचंद्र नेरकर, मंगलाबाई पाटील, कुसुंबा येथील रवींद्र चौधरी, संजय शिंदे, कैलास शिंदे, छोटू शिंदे, दिलीप सूर्यवंशी, गणेश शिंदे, लीलाबाई परदेशी, आत्माराम शिंदे, श्‍याम सूर्यवंशी, चौगाव येथील शंकर बोरसे, जगदीश बोरसे, सोमनाथ बोरसे, रतन बोरसे, रोहिदास पिंपळसे, जगदीश बोरसे, मुक्‍ताबाई शेवाळे, दिलीप बिलाडी, अना सोनवणे, प्रभाकर पाटील, हंसराज शिरसाट, देविदास बिलाडी, मोहनलाल बोरसे, रामकृष्ण बोरसे, दिलीप बोरसे, संजय गवळी, दिलीप गवळी, प्रकाश शिरसाट, गुलाब बिलाडी, ईश्‍वर मालचे, मुरलीधर माळी, भिका शिरसाट, सुरेश माळी, श्‍यामकांत शिरसाट, गुलाब सोनवणे, विश्‍वनाथ खैरनार, दत्तू देवरे, मच्छिंद्र मोरे, विठ्ठल माळी, हिलाल देवरे, विक्रम बोरसे, प्रकाश धोंडू बोरसे, प्रकाश हिंमत बोरसे, पंडित बोरसे, पुंडलिक शिंदे, अमृत वाघ व विठ्ठल खैरनार समावेश आहे.