निजामपूरला कॉलनी परिसरात एकाच रात्री आठ घरफोड्या

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनावर नाराजी...
नुकतेच काही दिवसांपूर्वी विकृत समाजकंटकांनी याच कॉलनी परिसरातील सुमारे 25 ते 30 वृक्षांची नासधूस करून जाळ्या चोरून नेल्या होत्या. त्यावेळीही कॉलनीवासीयांतर्फे निजामपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर वेळीच प्रभावी उपाययोजना न केल्याने चोरट्यांची हिम्मत अधिकच वाढली.

निजामपूर : येथील राणेनगरसह कॉलनी परिसरात आज रात्री सुमारे दीड ते दोन वाजेच्या सुमारास आठ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली. त्यामुळे कॉलनीवासीयांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यात निजामपूरच्या माजी उपसरपंच व तनिष्का सदस्या दिलनूरबी सय्यद, निवृत्त पोस्टमन, सेनेतील जवान व शिक्षक आदींच्या घरांचा समावेश आहे.

काल रक्षाबंधनाचा सण असल्याने बहुतेक बहिणी भावांकडे तर बहुतेक भाऊ हे बहिणींकडे बाहेरगावी गेल्यामुळे चोरट्यांनी संधी साधत मध्यरात्रीनंतर निजामपूरच्या राणेनगरातील माजी उपसरपंच तथा तनिष्का सदस्या दिलनूरबी सय्यद यांचे घर, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे यांचे आदिवासी वसतिगृह कार्यालयास भाडेतत्त्वावर दिलेले घर, शिक्षक संजीवन पवार यांचे इंदवे(ता.साक्री) येथील शिक्षक श्री. देवरे यांना दिलेले भाडेतत्त्वावरील घर, त्याच कॉलनीतील रहिवासी श्री.मोरे, माणिक श्रीराम भामरे, राकेश मधुकर गांगुर्डे, निवृत्त पोस्टमन रवींद्र गोविंदराव खैरनार व आमखेल (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व सद्या जम्मूत लष्करी सेवेत कार्यरत जवान महेश जगन्नाथ मोरे आदींच्या घरांचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटे तोडून त्यातील सामान अस्ताव्यस्त केला. काही विशेष मुद्देमाल हाती न लागल्याने किरकोळ स्वरूपाची चोरी करून अज्ञात चोरटे पसार झाले. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व घरांची कुलुपे सोबत घेऊन त्यांनी पोबारा केला. काही घरमालक बाहेरगावी असल्याने रात्री उशिरापर्यंत निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता.

ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनावर नाराजी...
नुकतेच काही दिवसांपूर्वी विकृत समाजकंटकांनी याच कॉलनी परिसरातील सुमारे 25 ते 30 वृक्षांची नासधूस करून जाळ्या चोरून नेल्या होत्या. त्यावेळीही कॉलनीवासीयांतर्फे निजामपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर वेळीच प्रभावी उपाययोजना न केल्याने चोरट्यांची हिम्मत अधिकच वाढली. रात्री उशिरापर्यंत पोलीस गस्तीची गरज असल्याचे रहिवाशांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. निजामपूर ग्रामपंचायतीनेही कॉलनी परिसरात त्वरित पथदिवे बसवावेत व कॉलनीसह गावातील मुख्य चौकांत किमान आठ ते दहा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी केली.

"वेळोवेळी पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदने देऊनही उपयोग होत नाही. पोलिसांची दहशत कमी झाल्याचा हा परिणाम आहे. वरिष्ठांनी वेळीच यात लक्ष घालावे अन्यथा जीवितहानीही होऊ शकते."
प्रा.डॉ. रवींद्र ठाकरे, माजी उपसभापती, पंचायत समिती, साक्री...

"आमच्या कुटुंबातील आठही सदस्य घरात झोपले असताना चोरट्यांनी खिडकी तोडून घरात प्रवेश केला. जर कोणाला जाग आली असती व प्रतिकार केला असता तर जिवावरही बेतली असती. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे."
श्री. युसूफ सय्यद, माजी जिल्हाध्यक्ष, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी, अल्पसंख्याक विभाग...

"मी नुकताच मागील आठवड्यात निजामपूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे येथून पुढे माझ्या कारकिर्दीत अवैध धंदे करणाऱ्यांची, गुंडांची व समाजकंटकांची गय केली जाणार नाही. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्यात येईल."
श्री. दिलीप खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक, निजामपूर पोलीस स्टेशन...

Web Title: dhule news decoit in dhule