धुळे: कर्जमाफीच्या वाऱ्यामुळे शेतकरी सभासदांनी थकविले 134 कोटी

Dhule news Farmers have exhausted 134 crores due to the loan waiver
Dhule news Farmers have exhausted 134 crores due to the loan waiver

धुळे - जिल्ह्यातील इतर बॅंकांपेक्षा यंदा खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपात धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आघाडीवर आहे. यात 252 कोटींच्या उद्दीष्टापैकी आतापर्यंत 75 कोटी 33 लाखांपर्यंत पीक कर्जाचे वाटप झाले. ही प्रक्रिया जुलैपर्यंत सुरू राहील, अशी माहिती बॅंक व्यवस्थापनाने दिली. त्याचवेळी जानेवारीपासून सुरू झालेल्या कर्जमाफीविषयी वाऱ्यामुळे बॅंकेच्या कार्यक्षेत्रात तब्बल 134 कोटींचे पीक कर्ज थकले असून वसुलीला अल्प प्रतिसाद असल्याने व्यवस्थापन चिंतेत आहे. 

पीक कर्ज वाटप 
जिल्हा बॅंकेचे दोन्ही जिल्हे मिळून दोन लाख 95 हजार शेतकरी सभासद आहेत. त्यात सुरू झालेल्या खरीप हंगामात धुळे जिल्ह्यात 125 कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यात 127 कोटी, असे मिळून 252 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट आहे. पैकी एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत दोन जूनपर्यंत धुळे जिल्ह्यातील 10 हजार 557 सभासदांना 52 कोटी 21 लाख, तर नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार 489 सभासदांना 23 कोटी 12 लाख, असे 14 हजार 46 सभासदांना एकूण 75 कोटी 33 लाखांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. हे प्रमाण उद्दीष्ट्याच्या 31 टक्के आहे. 

"कर्जमाफी'चा परिणाम 
राज्यासह जिल्ह्यात जानेवारीपासून शेती कर्जमाफीविषयी वारे वाहू लागले आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांचा संपही सुरू आहे. असे असताना आज ना उद्या शेती कर्जमाफी होईल, या आशेने धुळे जिल्ह्यातील 17 हजार 736 सभासदांनी सुमारे 66 कोटी, तर नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार 498 सभासदांनी सुमारे 68 कोटी, असे एकूण 32 हजार 234 शेतकरी सभासदांनी सरासरी 134 कोटींचे पीक कर्ज थकविले आहे. त्यामुळे बॅंकेपुढे अडचणीचा डोंगर असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले. यातून आज ना उद्या मार्ग निघेलच या आशेवर जिल्हा बॅंक स्थिती तारून नेत आहे. 

सधन गावातून पीक कर्ज थकले 
जिल्हा बॅंकेच्या कार्यक्षेत्रातील धुळे, शिरपूर, शहादा अशा काही तालुक्‍यातील अनेक सधन गावांमधील सधन शेतकऱ्यांनीही शेती कर्जमाफीच्या आशेने गेल्या खरीप हंगामात दिलेले पीक कर्ज थकविले आहे. कर्जमाफी मिळेल या आशेतून थकबाकीदार सभासदांनी जिल्हा बॅंकेचे पीक कर्ज थकविल्यानंतर 31 मार्चपर्यंत केवळ 30 टक्के वसुली होऊ शकली. हे प्रमाण वाढीसाठी बॅंकेचे प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com