मुलगी झाल्यास 6 महिने दाढी, कटींग मोफत

एल. बी. चौधरी
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुलगी हीच घरची लक्ष्मी असून मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने मोठी सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. मुलगाच पाहिजे हा हट्ट कमी झाला पाहिजे. मुलगी देखील म्हातारपणाची काठी होवू शकते. लोकांत ही जनजागृती निर्माण व्हावी म्हणून मी हा उपक्रम राबवित आहे. 
- समाधान रमेश निकम, वाघोदे ता. शिंदखेडा

सोनगीर (जि. धुळे) : स्वतः अठराविश्वे दारिद्र्य भोगणारा पण गावात कोणत्याही घरी कन्यारत्न जन्मास आल्यास सर्व गावात आपल्या खर्चाने मिठाई वाटणारा व त्या मुलीच्या वडिलांची सहा महिने दाढी कटिंग मोफत करणारा फक्त नावालाच शिक्षण घेतलेला पण मनाने आकाशाला गवसणी घालणाऱ्या एक अवलिया वाघोदे ता. शिंदखेडा येथे राहतो. त्याचे कार्य लहान असले तरी या स्वार्थी युगात जिथे मुलगी जन्मास येण्यापूर्वीच तिची हत्या केली जाते तेथे त्यांचे हे लहान कार्यही महान ठरते. 

वाघोदे हे अवघे दीड हजार लोकवस्तीचे गाव असून सर्व शेतकरी वर्ग आहे. समाधान रमेश निकम (वय 27) हे सलून व्यवसायावर पत्नी, लहान मुलगी, आई, वडील व लहान भावाचा उदरनिर्वाह चालतो. काहीच उत्पन्न न देणारी केवळ दीड बिघे कोरडवाहू शेती आहे. गरिबीमुळे समाधान यांना चौथीनंतर शाळा सोडून द्यावी लागली. 12 वर्षाचे असतानाच त्यांनी परंपरागत दाढी कटिंग करण्याचा व्यवसाय सुरू केला. आजही गवाही (दाढी कटिंग करण्याबद्दल वार्षिक मोबदला म्हणून धान्य अथवा पैसे मिळवणे) पध्दतीने त्यांचा व्यवसाय सुरू आहे. गावात टपरी टाकली आहे. दरम्यान तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्यावेळी  समाधान व त्यांची पत्नी मनिषाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदात त्याने गावभर जिलेबी वाटली व मुलगी झाल्याचे सर्वांना सांगितले. मुलीचे नाव तेजश्री ठेवले. ते प्रेमाने तेजू म्हणतात.

दरम्यान पैशाअभावी भावाचे शिक्षण थांबले. व तोही सलून व्यवसायात मदत करीत आहे. पत्नी, आई शेतमजूरी करतात. गरीबी असली तरी तेजूमुळे घरात चैतन्याचे वातावरण असते. मुलीचे बोबडे बोल थकवावरील औषध आहे. दरम्यान मुलीच्या जन्माचे गावात सर्वांनीच स्वागत करावे असा त्यांनी प्रयत्न केला. पण फारसे यश आले नाही. मुलीच्या पहिल्या वाढदिवशी त्यांनी ठरविले की यापुढे गावात कोणत्याही घरी कन्यारत्न जन्मास आल्यास स्वागत व आनंद व्यक्त करायचा. त्यानुसार मुलगी जन्मास आल्यास ते सर्वप्रथम तेथे पोहचतात व मुलीच्या वडिलांचे अभिनंदन करतात व मिठाई भरवतात. सर्व गावात स्वतःच्या खर्चाने साखर किंवा मिठाई वाटतात.

मुलीच्या वडीलांना यापुढे सहा महिने दाढी कटिंग फुकट करणार असल्याचे सांगतात.    एवढेच नव्हे तर मुलीचे जावळ मोफत काढून देतात. मुलीच्या जन्मास प्राधान्य मिळावे यासाठी त्यांनी टपरीवर फलक लावला असून त्यावर बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देत लेकीच्या जन्माचे स्वागत केले आहे. गरीब व अशिक्षित असूनही ते आपल्या या लहान कार्यातून अनेक श्रीमंत व सुशिक्षितांनाही लाजवेल असे महान कार्य करीत आहेत. 

मुलगी हीच घरची लक्ष्मी असून मुलींचा जन्मदर कमी होत असल्याने मोठी सामाजिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. मुलगाच पाहिजे हा हट्ट कमी झाला पाहिजे. मुलगी देखील म्हातारपणाची काठी होवू शकते. लोकांत ही जनजागृती निर्माण व्हावी म्हणून मी हा उपक्रम राबवित आहे. 
- समाधान रमेश निकम, वाघोदे ता. शिंदखेडा