निजामपूर-जैताणे बसस्थानकासह परिसरात मोकाट गुरांमुळे प्रचंड कोंडी

प्रा. भगवान जगदाळे
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकासह खुडाणे चौफुली व जैताणे ग्रामपंचायत चौक आदी परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यताही बळावली आहे. पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतींनी अशा मोकाट गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील बसस्थानकासह खुडाणे चौफुली व जैताणे ग्रामपंचायत चौक आदी परिसरात मोकाट गुरांमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून, त्यामुळे अपघाताची शक्यताही बळावली आहे. पोलिस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतींनी अशा मोकाट गुरांना ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

कोंडवाड्याची गरज...
जैताणे ग्रामपंचायतीमार्फत यापूर्वी कोंडवाडा चालविला जात होता. मात्र गेल्या पाच-सात वर्षांपासून तोही बंद अवस्थेत आहे. कोंडवाडा असून नसल्यासारखा आहे. त्यामुळे जैताणे ग्रामपंचायतीने कोंडवाडा कार्यान्वित करून अशा मोकाट गुरांना पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. निजामपूर ग्रामपंचायतीनेही कोंडवाड्याची सोय करून मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. स्थानिक पोलीस प्रशासनानेही मोकाट गुरे व त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करावी. अशीही मागणी आहे.

मोकाट कुत्र्यांचाही उपद्रव/उच्छाद...
सद्या निजामपूर-जैताणे या दोन्ही गावांमध्ये चौकाचौकात मोकाट कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून त्यामुळे अबालवृद्धांसह शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. काही चौकांत पथदिवे नसल्याने रात्री नऊ-दहा वाजेनंतर अशी मोकाट कुत्री अधिकच आक्रमक होतात. काही तर अक्षरशः मोटारसायकलींचाही पाठलाग करतात. स्थानिक प्रशासनाने अशा मोकाट कुत्र्यांचाही त्वरित बंदोबस्त करावा अशीही मागणी होत आहे.

जैताणे ग्रामपंचायत चौकातही वाहतुकीची कोंडी..
जैताणे ग्रामपंचायत चौकात दैनंदिन भाजी बाजार भरतो. तसेच याच चौकात सेंट्रल बँकेची शाखा देखील आहे. महा ई-सेवा केंद्र व एटीएम मशीनची सुविधाही याच चौकात असल्याने याठिकाणी मोटारसायकलीसह खाजगी वाहन चालक भर रस्त्यात वाहने उभी करतात त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बेदरकार व बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. ग्रामपंचायत चौकातच भर रस्त्यात पाण्याचे भले मोठे तळे साचलेले आहे. त्यावरही उपाययोजना होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत चौकातच दररोज सकाळी महात्मा फुले भाजीपाला मार्केट येथे भाजीपाला लिलाव होतो. तेथेही भर रस्त्यात शेतकरी व व्यापारी वाहने उभी करत असल्याने सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होते.

सदर सर्व समस्या सोडवून त्यावर उपाययोजना करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: dhule news jaitane bus stand traffic and animal