खबरदार, डीजे लावाल तर...

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

विसर्जन मिरवणूकीचा आंनद लहान मुले व महिलांनाही घेता यावा म्हणून विसर्जन मिरवणूक शांततेत व लवकर काढण्याबाबतीतही आवाहन यावेळी सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. दारू, गांजा, भांग आदी नशा करून जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी उपस्थितांना देऊन टाकला.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : येथील पोलिस ठाण्यात नुकतीच शांतता समिती व गणेश मंडळांच्या सदस्यांची बैठक संपन्न झाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर सरपंच संजय खैरनार, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, डॉ. हरिभाऊ ठाकरे, युसूफ सय्यद, ईश्वर न्याहळदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे, हेमंत मोहिते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात खास करून सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची काळजी घेण्यासंदर्भात गणेश मंडळांना आवाहन करण्यात आले. मा. सर्वोच्च न्यायालय व पोलीस प्रशासनातर्फे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी पालन करावे. 'डीजे'चा वापर कोणीही करू नये अन्यथा एक लाख रुपये दंड व पाच वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसेच प्रत्येक गणेश मंडळाने किमान दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून एक मूर्तीजवळ तर एक बाहेरच्या बाजूला बसविणे बंधनकारक आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीनेही तीन महत्वाच्या ठिकाणी असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून लोकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

विसर्जन मिरवणूकीचा आंनद लहान मुले व महिलांनाही घेता यावा म्हणून विसर्जन मिरवणूक शांततेत व लवकर काढण्याबाबतीतही आवाहन यावेळी सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले. दारू, गांजा, भांग आदी नशा करून जर कोणी नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी यावेळी उपस्थितांना देऊन टाकला. यावेळी सरपंच संजय खैरनार, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, युसुफ सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्यासह डॉ. हरिभाऊ ठाकरे, ईश्वर न्याहळदे, गणेश मंडळांचे पदाधिकारी व मुस्लिम समाजबांधव आदींनी पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पोलिस नाईक कांतीलाल अहिरे, मयूर सूर्यवंशी, ठाकूर आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रा. भगवान जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. एपीआय दिलीप खेडकर यांनी आभार मानले.