धुळे : मृग नक्षत्राची तडाखेबंद हजेरी; तीन रस्ते गेले वाहून

विनोद शिंदे
गुरुवार, 8 जून 2017

धुळ्याकडून आलेली वाहने उडाणे फाट्याकडून कुसुंबामार्गे जात होती, तर अन्य वाहने इतर मार्गांनी वळविण्यात आली होती. या सर्व परिस्थितीत अवजड वाहनधारकांचे मात्र हाल झाले.

कुसुंबा : मृग नक्षत्राच्या बुधवारी पाहिल्याच दिवशी धुळे तालुक्यातील कुसुंबा, मोराणे, आनंदखेडे, उडाणे, गोताणे, मेहेरगाव, निमडाळे आदी परिसरात बुधवारी सायंकाळी पाचनंतर सुमारे अडीच तास मुसळधार पाऊस झाला. रात्रभर तो मध्यम स्वरूपात होता. या पावसामुळे परिसरातील नाल्यासह पांझरा नदीला पूर आला. 

सद्य:स्थितीत धुळे- सूरत या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी जुने पूल पाडून तेथे नव्याने पूल उभारणी सुरू आहे. यामुळे त्या जागी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. पर्यायी मार्गासाठी तयार करण्यात आलेले असे तात्पुरते रस्ते अडीच तासाच्या मुसळधार, तडाखेबंद पावसात वाहून गेले.

इच्छापूर्ती गणेश मंदिर, तसेच उडाणे फाट्याजवळील हॉटेल एकताजवळ आणि आनंदखेडयाजवळील खा-या नाल्याजवळ तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहून गेला. त्यामुळे महार्मागावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. धुळ्याकडून आलेली वाहने उडाणे फाट्याकडून कुसुंबामार्गे जात होती, तर अन्य वाहने इतर मार्गांनी वळविण्यात आली होती. या सर्व परिस्थितीत अवजड वाहनधारकांचे मात्र हाल झाले. गुरुवारी सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू होते. अडीच तास चाललेल्या तडाखेबंद पावसामुळे परिसरात ढगफूटी झाली की काय? असा प्रश्न पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पडला.

फोटो गॅलरी