पंधरा वर्षांपासून 'ते' करताहेत अंतिमसंस्काराची पूर्वतयारी

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मयताच्या रक्षाविसर्जनासही ते न चुकता उपस्थित असतात. दशक्रिया विधीप्रसंगी दगडरुपी 'जीव' शोधून व पिठाचे लाडू बनवून कावळ्यांना ते नैवेद्यही दाखवतात. संपूर्ण परिसरात "भुरा दाजी" म्हणून ते परिचित असून यापूर्वी सुमारे 20-25 वर्ष ते शेळीपालक व मेंढपाळ होते. सन 2005 ते 2010 या कार्यकाळात ते जैताणेचे ग्रामपंचायत सदस्यही होते.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते भुराजी भाऊराव पगारे (वय-68) हे गेल्या पंधरा वर्षांपासून तर निजामपूर (ता.साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते बापू आनंदा बदामे (वय-64) हे गावासह परिसरात सुमारे दहा वर्षांपासून निस्वार्थीपणे अंत्यसंस्काराची पूर्वतयारी करून घेत असून दु:खितांचे दुःख जाणून घेत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी सेवेची दखल घेऊन दोन्ही ग्रामपंचायतींनी त्यांचा प्रोत्साहनपर गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही समाजात, केव्हाही जर कोणाचा मृत्यू झाला असेल तर तिथे निस्वार्थीपणे, बोलावण्याची अपेक्षा न ठेवता, न चुकता हजर राहणारे धनगर समाजाचे कार्यकर्ते भुराजी पगारे हे जैताणेसह परिसरात सुमारे पंधरा वर्षांपासून सेवाभावी वृत्तीने अंत्यसंस्काराची पूर्वतयारी करून घेत आहेत. अंत्यसंस्कारासमयी तिरडी सजविण्यापासून ते मृतदेहाची शेवटची आंघोळ घालण्यापर्यंत ज्या वस्तू लागतात अशा सर्व सतरा छोट्या मोठ्या वस्तूंची नावे त्यांची तोंडपाठ आहेत. त्यात खारीक, खोबरे, सुपारी, कवड्या, सुटे पैसे, अत्तर, नारळ, तूप, अगरबत्ती, आगपेटी, विड्याची पाने, मूरमुरे, कापूरवड्या, मडके, मयताच्या पायाचे अंगठे बांधायची तार, फटाके, फुगे, दोरा, रिबीन, पताका, मयत पुरुष असल्यास धोतरजोडा, टोपी, उपरणे आदी वस्तू त्यांच्या मुखोदगत आहेत. तरुण, वयोवृद्ध अशा मयताच्या वयोगटाप्रमाणे व मयताच्या कुटुंबियांच्या परिस्थितीनुसार साधारण एक हजार ते चार हजार एवढा खर्च अंत्यविधीसाठी येतो. ते स्वतः गावात जाऊन हा सर्व बाजार स्वतःच करून आणतात. काही वेळा मयताचे नातलग आधीच त्यांच्याकडे ही ठराविक रक्कम देतात. तर काही वेळा उधारी, उसनवारीनेही ते हा बाजार करून आणतात. सर्व तयारी झाल्यानंतर अंत्ययात्रेत स्वतः सामील होऊन प्रेताच्या अर्थात तिरडीच्या मागे चालत ते थेट स्मशानभूमीपर्यंत "राम बोलो, भाई राम" व "राम नाम सत्य है" असा जयघोष करत स्तुतीसुमने उधळतात. मागील दोन महिन्यात गावात किमान पन्नास ते साठ लोकांचा मृत्यू झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

मयताच्या रक्षाविसर्जनासही ते न चुकता उपस्थित असतात. दशक्रिया विधीप्रसंगी दगडरुपी 'जीव' शोधून व पिठाचे लाडू बनवून कावळ्यांना ते नैवेद्यही दाखवतात. संपूर्ण परिसरात "भुरा दाजी" म्हणून ते परिचित असून यापूर्वी सुमारे 20-25 वर्ष ते शेळीपालक व मेंढपाळ होते. सन 2005 ते 2010 या कार्यकाळात ते जैताणेचे ग्रामपंचायत सदस्यही होते. त्यांची दोन्ही मुले प्राथमिक शिक्षक असून एक सून वनरक्षक आहे तर मुलगीही जैताणेची माजी सरपंच आहे. श्री. पगारे यांच्यापुर्वी हे काम गावातीलच कै. वेडू शेलार व कै. रुपला बुधा पगारे हे करत होते. त्यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेत हे निस्वार्थी कार्य ते करीत आहेत.

दुसऱ्या बाजूला निजामपूर (ता.साक्री) येथील वाणी समाजाचे कार्यकर्ते व राहुल न्युज पेपर एजन्सीचे मालक बापू आनंदा बदामे हेही गेल्या दहा वर्षांपासून अंत्यसंस्काराची पूर्वतयारी निजामपूरसह परिसरात करत आहेत. आजही या वयात घरोघरी वर्तमानपत्र वाटप करून ते फावल्या वेळेत समाजसेवेची कामे करतात. स्वतः स्वाध्यायी असल्याने अंतिमसंस्काराच्या पूर्वतयारीचे काम ते आवडीने व निस्वार्थीपणे करतात. तसेच निजामपूरातीलच सामाजिक कार्यकर्ते भय्या गुरव, पांडू गुरव व गणेश पाटील हेही मयताच्या दहनासाठी स्मशानभूमीत लाकडे पोचविण्यापासून तर चिता रचण्यापर्यंतची सर्व कामे निस्वार्थी भावनेने करत आहेत. अशा निस्वार्थी कार्यकर्त्यांना समाजसेवेसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामपंचायतींनी त्यांचा यथोचित गौरव करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.