जवानांना घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 29 जानेवारी 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत गावातील भारतीय सेनेत कार्यरत जवानांच्या कुटुंबाला घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा एकमुखी ठराव केला, असा ठराव मंजूर करणारी जैताणे ग्रामपंचायत ही माळमाथा परिसरातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

यापूर्वी नेर (ता. धुळे) येथील ग्रामपंचायतीने असा ठराव पारित केला होता. संत सावता युवा प्रतिष्ठाचे अध्यक्ष रवींद्र जाधव, उपाध्यक्ष भटू देवरे, सदस्य किशोर बागुल, गोकुळ भदाणे, सदा महाजन आदींनी अर्जाद्वारे ही मागणी केली होती. जवानांच्या कुटुंबास हुतात्मा झाल्यानंतर वा मरणोपरांत सुविधा दिल्या जातात. परंतु, त्यांच्या हयातीतच त्यांना अशा सुविधा पुरविणे गरजेचे आहे, असेही अर्जदारांनी अर्जात नमूद केले आहे. समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेश बागुल यांनी भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांसह माजी मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधासाठी व त्यांच्या सुटकेसाठी ठराव मंजूर करणेबाबत ग्रामसभेत अर्ज सादर केला होता. त्यालाही ग्रामसभेत मंजूरी देण्यात आली.

ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन असल्याने वरिष्ठ लिपिक यादव भदाणे यांनी ग्रामसभेत उपलब्ध निधी, जमाखर्च व विकासकामांचा अहवाल ग्रामस्थांपुढे सादर केला. त्यांनतर ग्रामसभेत विविध विकासकामांबाबत चर्चा झाली. मात्र, वॉर्ड क्रमांक चारमधील एका अतिक्रमित कामावरून दोन गटांमध्ये ग्रामसभेत गदारोळ झाल्याने ग्रामसभा अर्ध्या तासातच गुंडाळावी लागली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या व ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर पेंढारे होते. सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जैताणेतील जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळांतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी भाषणांसह विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी उपसरपंच आबा भलकारे, माजी सरपंच दशरथ जाधव, गुलबा भलकारे, प्रकाश पाटील, माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे, ईश्वर न्याहळदे, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, शानाभाऊ बच्छाव, गणेश देवरे, दादा भिल, प्रमिलाबाई जाधव, मनीषा बागुल, रेवाबाई न्याहळदे, सुरेखा बोरसे, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, छाया कोठावदे, आशा सोनवणे, दौलत जाधव, राजेश बागुल, परशराम खलाणे, प्रकाश गवळे, भालचंद्र कोठावदे, भिका न्याहळदे, युवराज बोरसे, सुरेश सोनवणे, आबा भिल आदींसह प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी, माजी सैनिक व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: dhule news soldier home tax water tax jaitane gram panchayat