यशोगाथा अनाथ भावंडांची : आई-वडिलांच्या अपघाती निधनानंतरही मिळवलं लक्षणीय यश

प्रा. भगवान जगदाळे
रविवार, 2 जुलै 2017

"आज आई-वडील हयात असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. पण आमचे यश बघायला ते आज हयात नाहीत याचे वाईट वाटते." अशी प्रतिक्रिया प्रणाली व पंकज यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.

निजामपूर : सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक 28 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी सहा-साडेसहाच्या सुमारास धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर कुसुंब्याजवळील प्रियदर्शनी पेट्रोलपंपजवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात अकलाड (ता. धुळे) येथील कैलास तुकाराम बाविस्कर व अरुणाबाई कैलास बाविस्कर हे चाळीशीतील तरुण शेतकरी दांपत्य जागेवरच ठार झाले. आणि पंकज, प्रणाली व भूषण ही तिन्ही भावंडे क्षणात पोरकी झाली.

त्यावेळी पंकज हा निजामपूर-जैताणे येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात किमान कौशल्य विभागात बारावीत शिकत होता. तो खुडाणे (ता. साक्री) येथे मामांकडे राहून ये-जा करीत होता. तर प्रणाली व भूषण अकलाड (ता. धुळे) येथील कै. आर.जी. माळी माध्यमिक विद्यालयात अनुक्रमे इयत्ता दहावी व आठवी इयत्तेत शिकत होते. अचानक घडलेल्या या घटनेने बाविस्कर कुटुंब हादरले व ही तिन्ही भावंडे पोरकी झालीत. श्रीमती लताबाई या विधवा व वृद्ध आईस आपल्या डोळ्यांदेखत मुलगा आणि सुनेला अखेरचा निरोप दयावा लागला.

अल्पवयात अनाथ झालेल्या मुलांना काका विलास तुकाराम बाविस्कर, काकू किरणबाई बाविस्कर यांच्यासह खुडाणे (ता. साक्री) येथील आजी-बाबा सुभाष शेवाळे, विमलबाई शेवाळे व मामा प्रा. गणेश शेवाळे यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी आधार देत सावरले व त्यांना जिद्दीने परीक्षा देण्याचा सल्ला दिला. धीर दिल्यामुळे तिन्ही अनाथ मुलांनी स्वतःला सावरत फेब्रुवारी-मार्च महिन्यात मोठया जिद्दीने दहावी-बारावीची परीक्षा दिली. त्यात प्रणाली ही अकलाड (ता. धुळे) येथील कै. आर. जी. माळी माध्यमिक विद्यालयातून इयत्ता दहावीत 84.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर तिचा मोठा भाऊ पंकज हाही निजामपूर-जैताणे (ता. साक्री) येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातून इयत्ता बारावीच्या किमान कौशल्य विभागातून 67.08 टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. लहान भाऊ भूषण हाही इयत्ता आठवीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला.

सध्या या तिन्ही अनाथ मुलांचा सांभाळ शेतकरी असलेले अकलाड येथील त्यांचे काका-काकू व खुडाणे येथील विकासोचे माजी सचिव व विद्यमान चेअरमन असलेले त्यांचे आजी-आजोबा, मामा-मामी करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे दोन्ही शाळांसह संपूर्ण परिसर व जिल्ह्यांतून त्यांचे कौतुक होत आहे. आता येथून पुढे गरज आहे त्यांना धीर देण्याची व सावरण्याची. प्रणाली धुळे येथे अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेणार असून पंकज हाही व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहू इच्छित आहे. तीच खरी त्यांच्या अपघाती मृत आई-वडिलांना श्रद्धांजली ठरेल.