ऑनलाइन अर्ज भरताना रिकाम्या जागा ठेवू नका; अन्यथा अर्ज होणार बाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.

जळगाव - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरताना तो रिकामा ठेवू नका. ज्या ठिकाणी पर्यायाचे उत्तर नसेल त्या ठिकाणी रेष ओढा. मात्र ती जागा रिक्त ठेवू नका. अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जळगाव तालुक्‍याचे निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांनी आज येथे दिली.
पत्रकार संघाच्या कार्यालयात आज ऑनलाइन अर्ज भरण्यासंदर्भात घेण्यात आलेल्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम उपस्थित होते.

श्री. शर्मा म्हणाले, की या निवडणुकीत 27 जानेवारीपासून अर्ज भरणे सुरू होतील. ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रिंट काढावी. त्याची नोटरी करून योग्य ती कागदपत्रे सोबत जोडून तो अर्ज सादर करावा.

परवानगीची सोय
उमेदवारांना प्रचारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी धावपळ होते. ती वाचावी, यासाठी एकखिडकी योजना या निवडणुकीसाठी सुरू केली आहे. त्यात अर्ज दिल्यानंतर उमेदवारांना संबंधित परवानगी मिळेल.

राखीव जागेबाबत दाखला
ज्या ठिकाणी राखीव जागेवर निवडणूक लढवायची आहे त्या जागेवरील इच्छुक उमेदवाराने स्वतःच्या जातीचा दाखला सोबतच जोडणे आवश्‍यक आहे. दाखला तयार करण्यासाठी दिला असेल, तर त्याची पोच पावती सोबत लावावी. त्यावर दाखल्याचे प्रकरण पेडिंग असल्याबाबतचा संबंधित विभागाचा अभिप्राय आणावा.

राजकीय प्रतिनिधींमध्ये विजय नारखेडे, गोपाळ पाटील, संजय भोळे, विनायक चव्हाण, भाऊसाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे, सुनील ठाकूर यांनी सहकार्य केले.

शौचालय घरी असले पाहिजे
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवारांच्या घरी शौचालय असणे गरजेचे आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा ठराव सोबत जोडणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवाराच्या घरी शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव लागलीच मिळणार नाही. याबाबत उपस्थितांनी शंका उपस्थित केली. त्यावर श्री. शर्मा यांनी या मुद्याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवू, असे सांगितले.

उमेदवारास दहा वाहनांचीच परवानगी
प्रचार करताना कोणत्याही उमेदवाराला केवळ दहा वाहने वापरता येतील. त्यात तीन ते चार चारचाकी वाहने, इतर सहा वाहने दुचाकी असावीत. कोणता उमेदवार किती वाहने वापरतो, यावरही आचारसंहिता विभागाचे लक्ष असेल, असे श्री. शर्मा यांनी सांगितले.

Web Title: Do not put empty space filling the online application