जातीपातीवर दंगल माजवू नका - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

दोन लाख बोगस आदिवासी - ढवळे 
राज्यातील एकलव्य सेनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे म्हणाले, की राज्यात दोन लाख बोगस आदिवासी नोकरीत आहेत. आठ लाख बोगस आदिवासी शैक्षणिक सवलती घेत आहेत. मूळ आदिवासींचा ते हक्क हिरावून त्यांना ते त्यांच्या फायद्यापासून वंचित ठेवत आहेत. आदिवासींना त्यांचे हक्क द्यावेत, परंतु त्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

जळगाव - जातीपातीच्या प्रश्‍नावर राजकारण करून राज्यात दंगल माजविण्याचा प्रयत्न होत आहे, घर पेटविणे सोपे असते. चुली पेटविणे कठीण आहे. पोटातील भुकेची आग विझविण्यासाठी चुली पेटविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शरद पवार यांनी सत्तेत असताना मराठा आरक्षण, "ऍट्रॉसिटी‘ प्रश्‍न का नाही सोडविला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तेथे जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ग्रामविकास मंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, एकलव्य सेनेचे शिवाजी ढवळे उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, ""राज्यात आज नेत्यांच्या पुतळ्याला हार घालून जातीपातीत विभागणी केली जात आहे. मात्र गरिबांना आज जात नाही तर पोटाचा प्रश्‍न आहे. भुकेला पोटाला जात नसते. राजकर्त्यांनी या भुकेल्यांचे पोट कसे भरले जाईल याचा विचार करण्याची गरज आहे.‘‘ 

""मराठ्यांना आरक्षण हा त्यांचा न्याय हक्क आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे. ओबीसी आरक्षणाला जराही धक्का न लावता त्यांना दिलेच पाहिजे. मराठ्यांचीही तीच मागणी आहे, ते दुसऱ्याचे खेचून घेऊ इच्छित नाहीत. राज्य सरकारने केवळ आरक्षण देऊ म्हणण्यापेक्षा केव्हा देणार यांची घोषणा करावी. मराठा आरक्षण प्रश्‍नावर पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, परंतु त्यांनी आरक्षण व "ऍट्रॉसिटी‘ हे दोन्ही प्रश्‍न आघाडी सरकारच्या काळात सत्तेत असतानाच का नाही सोडविले. सत्तेच्या काळात त्यांनी सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्याकडे पाणीच भरले काय,‘‘ अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 

आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी शिवसेनेची अगोदरपासूनच मागणी आहे, जर हे केले असते, तर आज मराठा समाजावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. मात्र आता कॅबिनेटमध्ये सरकारने त्याबाबत निर्णय घेतला आहे. आम्ही केलेली मागणी त्यांनी पूर्ण केली ही चांगली बाब असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सत्तेतील सहभागाबाबत ते म्हणाले, की आम्ही जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी आहोत, जर शेतकरी आणि जनतेवर अन्याय होत असेल, तर आम्ही सत्तेतील सरकारला साथ देणार नाही. सरकारच्या विरोधात आंदोलन करू. पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये लष्कराने केलेल्या क"सर्जिकल स्ट्राइक‘चे श्रेय घेण्यासाठी करण्यात आलेले राजकारण लज्जास्पद आहे. जनतेने त्यासाठी निवडून दिलेले नाही, त्यामुळे याचे कोणीही राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.