गर्भलिंग निदानाबद्दल डॉ. देवरे बंधूंना शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश

वैद्यकीय परवाना रद्द करण्याचा न्यायालयाचा आदेश
मालेगाव - शहरातील सटाणा नाका भागातील शिवमंगल सोनोग्राफी केंद्र व कॅम्प रस्त्यावरील सीताबाई हॉस्पिटलच्या सहकार्याने गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने डॉ. अभिजित शिवाजी देवरे व त्यांचे बंधू डॉ. सुमित शिवाजी देवरे यांना येथील न्यायालयाने शिक्षा सुनावली. डॉ. अभिजित यांना तीन वर्षे कारावासाची; तर डॉ. सुमित यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एम. एच. बेग यांनी हा निकाल दिला.

सांगली जिल्ह्यातील 19 अर्भक प्रकरण सुरू असतानाच हा निकाल लागल्याने वैद्यकीय क्षेत्राला गंभीर इशारा मिळाला. येथील कॅम्प रस्त्यावरील सीताबाई हॉस्पिटलच्या माध्यमातून गर्भलिंग निदान होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन "लेक लाडकी' अभियानाच्या पथकाने स्टिंग ऑपरेशन करून 20 जुलै 2013 ला हा प्रकार उघडकीस आणला होता. सीताबाई हॉस्पिटलमध्ये डॉ. सुमित यांच्याकडे पथकाने गर्भवती महिलेला पाठविले. त्यांनी तिची तपासणी व सोनोग्राफीसाठी बंधू डॉ. अभिजित यांच्याकडे पाठविले व तसा दूरध्वनीदेखील केला. अभिजित यांनी साडेबारा हजार रुपये आकारत महिलेचे तपासणी करून मुलगी असल्याचे निदान केले होते. यानंतर लेक लाडकी पथक व सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांच्या प्रयत्नांतून सोनोग्राफी सेंटरला सील करण्यात आले होते. महापालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गढरी यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. येथील न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान) प्रतिबंध अधिनियम 2003चे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून दोघा देवरे बंधूंविरुद्ध खटला सुरू होता.

न्यायाधीश बेग यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील व्ही. पी. बोराळे व सुवर्णा शेपाळकर यांनी काम पाहिले. गुन्ह्यात दोषी आढळल्याने सोनोग्राफी केंद्राचे प्रमुख डॉ. अभिजित देवरे यांना तीन वर्षे कारावास, 17 हजार रुपये दंड; तर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुमित देवरे यांना सहा महिने कारावास व सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश बेग यांनी सुनावली. त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याचाही आदेश दिला.