गणवेश बदलाचे फर्मान दुष्काळात तेरावा महिना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जून 2016

मालेगाव कॅम्प - दुष्काळाच्या झळा झेलत यंदाच्या शैक्षणिक वर्षाला सामोरे जाताना पालकांची भंबेरी उडाली आहे. साधने, खरेदी, शाळांतील प्रवेशासाठी प्रचंड स्पर्धा, बालकांच्या वाहतूक व्यवस्थापनाची जुळवाजुळव या कोलाहलात शहरातील लहान-मोठ्या शाळांनी अचानक गणवेश बदलाचे फर्मान सोडल्याने "ही नसती उठाठेव‘ म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. ऐन दुष्काळात हे फर्मान कशासाठी, असा सवाल होत असून, ते मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहरासह ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत विद्यार्थ्यांना गणवेशाचा शिरस्ता आहे. ज्या-त्या शाळेचा गणवेश ही शाळेची ओळख मानली जाते. शहरी भागात जास्त विद्यार्थिसंख्येच्या शाळांची संख्या मोठी आहे. यंदा दप्तर, बूट, सॉक्‍स, वह्या, पेन, पेन्सिल, संदर्भ पुस्तके यांच्या किमती वाढल्या आहेत. अत्यावश्‍यक खरेदी म्हणून पालकांना हा भार पेलावाच लागतोय. मूकपणे ही खरेदी सुरू असताना अनेक परिवारांनी दुष्काळामुळे कमी खर्चातील वा सेवाभावी संस्थांकडील कमी दरातील विक्री केंद्राला पसंती दिली आहे. शाळा आणि घर हे अंतर पार पाडण्यासाठी सायकल, रिक्षा, स्कूल बस, एस.टी. सेवा याचा आधार घेऊन सुवर्णमध्य काढण्याकडे पालकांचा कल आहे. गणवेशाबाबत मागील वर्षाचाच गणवेश वापरावा, असा सल्ला पालक पाल्याला देत असताना शहरातील शाळांनी गणवेश बदलाचे फर्मान सोडले आहे. ठराविक दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याच्या सूचना शाळाशाळांत देण्यात येत आहेत. गेल्या वर्षीचा सुस्थितीचा गणवेश टाकून देत पाल्यांनाही हा भार अवघड झाला आहे. दुकानदारांकडून शाळांना मिळणारी "छुपी मदत‘ हेच या गणवेश बदलामागील खरे अर्थकारण असल्याचे बोलले जाते.

मनमानीचा पालकांना मनस्ताप
गणवेश बदलाबाबत शिक्षण विभागाकडून कोणत्याही सूचना नसताना शाळांनी आरंभलेली मनमानी पालकांना मनस्ताप देणारी आहे. शिक्षण विभागाने गणवेश बदलाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करणे, शाळांच्या मनमानीला रोखणे गरजेचे आहे. खासगी माध्यमिक, उच्च माध्यमिक, इंग्रजी माध्यमाच्या शाळांत गणवेश बदलाचा फंडा सध्या जोरात आहे. गणवेश बदल हा शाळांसाठी आवश्‍यक मुद्दा नाही. शाळा व्यवस्थापन दुष्काळी वर्षात पालकांच्या सोबत आहे हा संदेश देण्याची संधी असताना गणवेश बदलांचे फर्मान शाळा व पालक यात दरी निर्माण करीत आहे.