बहुरुपींवरील संशयामुळे कला धोक्‍यात 

bahurupi.jpg
bahurupi.jpg

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बहुरूपी हा रोज एक सोंग घेऊन गावात येतो. कधी पोलिस, कधी इंग्लिशमन, कधी जख्ख म्हातारा तर कधी बाईचे सोंग घेऊन हे भटके भिक्षेकरी आपल्या कलेवर पोट भरतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बहुरुपींवर मुले पळविण्याचा संशय वाढल्याने त्यांची कला धोक्‍यात आली आहे. विसापूर तांडा (ता. चाळीसगाव) येथे काल (15 जून) घडलेल्या प्रकारातून बहुरुपींना प्रचंड नैराश्‍य आले असून पोटाची खळगी भरण्यासाठी शासनानेच मदत करावी, अशी आर्त मागणी बहुरुपींमधून होत आहे. 

माहाष्ट्रात सध्या मुले पळविणाऱ्या फासे पारधींच्या टोळ्या, त्या संदर्भातील छायाचित्रे व व्हीडीओ गेल्या अनेक दिवसापासून "सोशल मिडिया'वर फिरत आहे. या व्हीडीओ मधील मुले चोरी करणारे विसापूर तांडा येथे आल्याच्या संशयावरून सहा बहुरुपींना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला. वास्तविक, त्यांना मारहाण सुरू असताना सहाही जण "आम्ही भिक्षुकी आहेत. आमचा धर्म आहे म्हणून आम्ही गावोगावी जाऊन भिक मागतो व पोट भरतो' असे पोटतिडकीने सांगत होते. मात्र, त्यांचे काहीही ऐकून घेण्याच्या ग्रामस्थ मनःस्थितीत नव्हते. अखेर पोलिस आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. मात्र, तोपर्यंत बहुरुपी प्रचंड भेदरलेले होते. 

पोलिस परवानगी घ्यावी 

विसापूर तांडा येथे आलेले बहुरुपी हे मुक्ताईनगर तालुक्‍यातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वास्तविक, त्यांना ज्या गावात जायचे आहे, त्या गावात जाण्यासाठी त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात रीतसर परवानगी घेतली असती तर कदाचित कालचा प्रकार घडला नसता. पोलिस परवानगी घेणे शक्‍य नसले तरी ज्या गावात त्यांना भिक्षा मागायची आहे, त्या गावच्या किमान सरपंचांची भेट घेऊन तरी त्यांना विचारणा करायला हवी होती. औरंगाबाद जिल्ह्यात चोर समजून जमावाने दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. यात त्या दोघांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 400 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झाला आहे. असा प्रकार विसापूर येथे झाला असता, तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. बहुरुपींच्या संदर्भात कालचा घडलेला प्रकार चुकीचा घडला असला तरी त्यातून त्यांनी देखील बोध घेणे गरजेचे आहे. 

आमदारांनी बहुरूपीच्या कानशीलात मारल्याची चर्चा 

विसापूर तांडा येथे काल आमदार उन्मेष पाटील यांनी एका बहुरूपीच्या कानशीलात लगावली. हे करीत असताना त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग झाल्याने या घटनेचा "व्हीडीओ' सर्वत्र व्हायरल झाला. ग्रामस्थांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांची अशी प्रतिक्रिया व्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. आमदारांच्या या "व्हीडीओ'ची परिसरात एकच चर्चा मात्र सुरू होती. 

बहुरूपींची गाडी विसापूर येथून चिंचगव्हाण फाट्यावर आली. त्या ठिकाणी गाडीचे ज्यांनी नुकसान केले. त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. लवकरच गुन्हाही दाखल केला जाईल. या भागात आलेल्या बहुरूपींनी पोलिस ठाण्यात भटके रजिस्टरमध्ये नोंद करावी, जेणेकरून त्यांना अशा अडचणी येणार नाहीत. 
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मेहुणबारे (ता. चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com