ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

एरंडोल - कासोदा- आडगाव गटातील मतदारांनी विश्‍वास दाखवून मला विजयी केले. पक्षाने माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास अध्यक्षपदाची संधी देऊन न्याय दिला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील यांनी केले. 

एरंडोल - कासोदा- आडगाव गटातील मतदारांनी विश्‍वास दाखवून मला विजयी केले. पक्षाने माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यास अध्यक्षपदाची संधी देऊन न्याय दिला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापदी उज्वला पाटील यांची निवड झाल्याबद्दल फरकांडे (ता. एरंडोल) येथे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांतर्फे झालेल्या नागरी सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम लुकडू पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी अध्यक्षा उज्वला पाटील यांची मिरवणुक काढण्यात आली. 

श्रीमती पाटील म्हणाल्या, की ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शिक्षण यासारख्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यास न्याय दिला जातो, हे माझ्या निवडीवरून सिद्ध झाले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामीण भागासाठी असलेल्या विविध विकास योजनांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. फरकांडे येथील सरपंच श्रीमती किरण पाटील यांनी गावासाठी शुद्ध पाणी मिळावे, गावातील अंतर्गत रस्त्यांचे कॉक्रिटिकरण करण्यात यावे, प्रवेशद्वार बांधण्यात यावे, फरकांडे नादखुर्द रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत काम करण्यात यावे. ऐतिहासिक झुलते मनोऱ्यांचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन अध्यक्षा पाटील यांना दिले. यावेळी ग्रामपंचायत, विविध कार्यकारी संस्था, शंभूराजे दूध उत्पादक संस्था व सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्षा उज्वला पाटील यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच सुरेश पाटील, जयश्री ठाकरे, उपसरपंच लताबाई भिल, ग्रामपंचायत सदस्या रेखा बेहरे, ज्योती पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच रोहिदास पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, शांताराम चव्हाण, छगन बेहरे, भीमराव बेहरे, देवेंद्र देशमुख, झिपरू पाटील, पांडुरंग पाटील, शालिग्राम पाटील, भिकन पाटील, दीपक पाथरवट आदींनी सहकार्य केले.