निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रावळगावमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइंचे उमेदवार निश्‍चित?

गोकुळ खैरनार - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मालेगाव - तालुक्‍यात एकमेव खुला असलेल्या जिल्हा परिषदेच्या रावळगाव गटात निवडणुकीची घमासान सुरू आहे. भाजप व शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले असून, संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. भाजपचे समाधान हिरे व शिवसेनेचे रमेश आहिरे या संभाव्य उमेदवारांचा तिळगूळ व शुभेच्छापत्रे मतदारपर्यंत पोचली आहेत. शिवसेना व भाजपच्या नेतृत्वाने संभाव्य उमेदवाराला स्पष्ट संकेत दिल्याने इतर इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सोडून दिला आहे. रिपाइंचे प्रशांत गरुड यांची उमेदवारी निश्‍चित असून, त्यांनी गटातील संपर्क वाढविला आहे. 

आरपी ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक व कॉंग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या संजय हिरे यांनीही कारखान्यातील कार्यक्रमाचे औचित्य साधून जेवणावळीचा मोठा कार्यक्रम घडवून आणला. त्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटात मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करणार आहे. रावळगाव गटात रावळगाव, पांढरूण, तळवाडे, ढवळेश्‍वर, वडेल, अजंग, दुंधे, पिंपळगाव, सातमाने, बेळगाव व जळगाव (गा.) या सात गावांचा समावेश आहे. गटात सलग दोन निवडणुकांत शिवसेनेने विजय मिळविला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. गटात भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी पाच ते सहा जण इच्छुक होते. भाजपने सर्वप्रथम श्री. हिरे यांना उमेदवारीचे संकेत दिले. त्यापाठोपाठ शिवसेनेनेही श्री. आहिरे यांना हिरवा कंदील दाखविला. श्री. गरुड यांचीही उमेदवारी निश्‍चित झाली. तिन्ही पक्षांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांना स्पष्ट संकेत दिल्याने इतर इच्छुकांचा हिरमोड झाला. भाजप व शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी गाव, वाड्या-वस्त्या व शेतमळ्यांमध्ये गाठीभेटी, प्रचार सुरू केला आहे. या मोहिमेत समर्थक व त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. 

श्री. गरुड यांनी महिन्यापासून गटाचे दौरे सुरू केले आहेत. ठिकठिकाणी बैठका घेऊन ते कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करीत आहेत. तालुक्‍यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. जयंत पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कॉंग्रेसकडून संजय हिरे व दत्तात्रय वडक्ते यांची नावे आहेत. संजय हिरे यांनी 15 दिवसांपूर्वी त्यांच्या कारखान्यात शेतकरी व परिसरातील नागरिकांचा जेवणावळीचा मोठा कार्यक्रम घेत शक्तिप्रदर्शन केले. 

ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गटाचा दौरा करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांनी गटावर वर्चस्व मिळविण्यासाठी गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. गटाची निवडणूक भुसे व हिरे या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.