अभियांत्रिकीच्या कर्मचाऱ्याचा अमानुष छळ

crime
crime

जळगाव - शहरातील पिंप्राळा येथील 48 वर्षीय रहिवासी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यास हेरुन अज्ञात भामट्यांनी बेदम मारहाण केली, अमानुष असा छळ करुन अत्यवस्थेत सोडत त्याच्याजवळील दहा हजाराच्या रोकडसह अंगावरील पॅंट बळजबरीने उतरवून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली. या गंभीर घटनेत जखमीस मेंदूत रक्तस्राव झाल्याने तो कोमात असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात मदतनीस म्हणून कार्यरत तथा पिंप्राळ्याच्या पाटीलवाड्यातील रहिवासी मानसिंग नामदेव पाटील (वय-48) मंगळवारी (ता.22) कामावर गेले. महाविद्यालयाचे प्रमुख रावसाहेब शेखावत यांच्या निवासस्थानी आवश्‍यक काम असल्याने ते दुपारीच शहरात परतले होते. काम उरकल्यावर ते भाजीपाला घेण्यासाठी रिक्षाने इच्छापूर्ती मंदिराजवळ उतरले. तेथून एका व्यक्‍तीसोबत पायीच नवीन बी.जे.मार्केट परिसरात आले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याचे कुटूंबीयांचे म्हणणे आहे.

जिल्हापेठला कळाले...
शोधाशोध करुनही मानसिंग पाटील मिळून आले नाही म्हणून कुटूंबीयांनी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. बेपत्ता म्हणून नोंद करत असतानाच त्यांना पोलिसांनी, नवीन बी.जे.मार्केटच्या पहिल्या मजल्यावर जखमी अवस्थेत एक अनोळखी व्यक्ती आढळल्याची माहिती दिली. खात्री करुन घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्याठिकाणी धाव घेतली.

पॅंटसहीत दहा हजार लंपास
मानसिंग पाटील महाविद्यालयातून निघाले तेव्हा त्यांच्याकडे दहा हजार रुपये महाविद्यालयाच्या कामासाठी रोख देण्यात आली होती. बुधवारी सकाळी पोलिसांना ते बी.जे.मार्केटच्या डी-विंग मधील स्वच्छतागृहात जखमी अवस्थेत आढळून आले, त्याच्या अंगावरील पॅंटसहीत भामट्यांनी दहा हजारांची रोकडही लंपास केल्याने आढळून आले.

अमानवीय पद्धतीने छळून मारहाण
आज सकाळी बुधवारी रक्ताच्या थारोळ्यात पाटील निपचित पडलेले आढळून आले, चेहऱ्यावर खरचटल्याच्या खुणा, मुकामार तसेच त्यांच्या डोक्‍यावर तीव्र प्रहार केल्याने झालेली मोठी जखम आहे. मारहाणीत त्यांच्या डोक्‍याला झालेल्या दुखापतीमुळे मेंदूत रक्तस्राव झाल्याने ते कोमात गेले असून प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

साधी नोंदही नाही पोलिसांत
मानसिंग पाटील यांचा शोध लागला असून त्यांना मारहाण करून लुटण्यात आलेली आहे, हे माहिती असूनही जिल्हापेठ पोलिसात कुठलीही नोंद घेण्याची तसदी पोलिसांनी घेतली नाही. घडल्या प्रकारा संदर्भात जिल्हापेठ पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत, "उपचारानंतर जबाब घेऊन होईल गुन्हा दाखल' असे उत्तर दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com