एरंडोल- कासोदा रस्त्याची दैना 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

एरंडोल - राष्ट्रीय महामार्गापासून अमळनेर नाक्‍याकडून जाणाऱ्या कासोदा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

एरंडोल - राष्ट्रीय महामार्गापासून अमळनेर नाक्‍याकडून जाणाऱ्या कासोदा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. 

एक किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप रस्तादुरुस्तीस सुरवात न झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. 

येथून कासोद्याकडे जाणाऱ्या व अमळनेर नाक्‍यापासून अंजनी नदीवरील पुलापर्यंत सुमारे एक किलोमीटर रस्त्यावर दहा फुटांच्या अंतरावर खड्डे पडले असून, रस्त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. रस्त्यावरून चाळीसगाव, औरंगाबाद, येवला येथे जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, अनेक वेळा वाहने रस्त्यावरच नादुरुस्त होऊन बंद पडत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या रस्त्यापासून सुमारे दीड ते दोन फूट खोल गेल्यामुळे दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन बाजूला घेण्यावरून चालकांमध्ये वाद होतात. रस्त्याच्या कडेलाच नागरिकांचा रहिवास असल्यामुळे कोणतीही दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एक किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे लागतात. 

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून मंजुरी मिळाली असल्याचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप रस्त्याच्या कामास सुरवात झाली नाही. सद्यःस्थितीत रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. विशेष म्हणजे रस्त्यावरून स्थानिक आजी- माजी लोकप्रतिनिधींचा नियमितपणे वापर असतानादेखील रस्त्याच्या दुरवस्थेकडे त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा परिषद व पालिका या तिघांपैकी कोणाच्या अखत्यारीत येतो, याबाबत प्रश्‍नचिन्ह असून, रस्त्यावर नेमकी मालकी कोणाची आहे? याबाबत तिन्ही कार्यालयांत संपर्क साधला असता अपेक्षित उत्तर मिळू शकले नाही. रस्त्यावरीला खड्ड्यांमुळे रोज किरकोळ स्वरूपाचे अपघात होत असून, भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसस्थानकावरून शहरात याच रत्यावरून येण्या- जाण्याचा मार्ग असून, त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून शेवटची घटका मोजत असलेल्या कासोदा रस्त्याची दुरुस्ती करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

Web Title: Erandola kasoda streets of big pits