डांभुर्णीत शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जळगाव - डांभुर्णी (ता. यावल) येथील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. विवाह होऊन सात-आठ वर्षांनंतरही मूलबाळ होत नाही, म्हणून संबंधितांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

जळगाव - डांभुर्णी (ता. यावल) येथील एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. विवाह होऊन सात-आठ वर्षांनंतरही मूलबाळ होत नाही, म्हणून संबंधितांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिठाराम रघुनाथ कोळी डांभुर्णी येथे पत्नी मनीषासमवेत राहून शेतीकाम करायचे. आज मिठाराम यांच्याशेजारी राहणारी महिला सकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या घरी चहा पावडर घेण्यासाठी आली असता तिने दार ठोठावले. परंतु आतून कुणाचाही आवाज येत नसल्याने त्यांनी दार ओढून पाहिले असता मिठाराम व त्यांची पत्नी मनीषा यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने आरडाओरड करण्यास सुरवात केली आणि त्यातच ती भोवळ येऊन पडली. यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मिठाराम यांचे मोठे भाऊ वासुदेव यांना मिठाराम व त्यांच्या पत्नीने गळफास घेतल्याची माहिती दिली. त्यांनी तत्काळ भावाच्या घरी येऊन प्रकार पाहिल्यावर आक्रोश केला. पोलिसपाटील हेमराज साळवे व गावकऱ्यांच्या मदतीने संबंधित दाम्पत्याला खाली उतरविले. रुग्णवाहिकेतून यावलला नेऊन प्राथमिक तपासणी केल्यानंतर डॉक्‍टरांनी दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना जळगावात विच्छेदनासाठी आणले. यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. मिठाराम यांच्यामागे आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही मृतदेह घेऊन नातेवाइक डांभुर्णीकडे रवाना झाले.

कुणालाही दोषी धरू नये..!
मिठाराम व त्यांच्या पत्नी मनीषा यांनी आत्महत्येपूर्वी राहत्या घरातील भिंतीवर कोळशाने लिहिलेले होते. त्यात त्यांनी आम्हाला कुणाचाही त्रास नसून, आम्ही तरीही आत्महत्या करीत आहोत. यात कुणालाही दोषी धरू नये, असे लिहिलेले होते. मात्र, कोळी दाम्पत्याने केलेल्या आत्महत्येचे मूळ कारण अद्याप समजू शकलेले नाही.