‘दारणे’ची बदललेली दिशा अन्‌ शेतीच्या प्रश्‍नांमुळे धास्तावले शेतकरी

‘दारणे’ची बदललेली दिशा अन्‌ शेतीच्या प्रश्‍नांमुळे धास्तावले शेतकरी

चाडेगाव, देवळाली आणि दारणा नदीची शीव असलेल्या चेहेडीची लोकसंख्या सहा हजारांपर्यंत आहे. त्यात स्थानिक रहिवासी दीड हजारापर्यंत आहेत. ताजनपुरे, बोराडे, सातपुते, घोडे, आवारे, पेखळे, दोंड, कोहकडे या स्थानिक कुटुंबीयांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. इथला शेतकरीराजा ‘दारणा’च्या बदलत चाललेल्या दिशेसह खचणाऱ्या शेतीच्या प्रश्‍नाने धास्तावला आहे. दर वर्षी किमान वीस फूट क्षेत्राची धूप होते. आतापर्यंत दहा एकर क्षेत्राची धूप झाली आहे. त्यावर उपाय म्हणून पंपिंग स्टेशन ते मळईपर्यंत दारणाच्या काठेला संरक्षक भिंत बांधण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांची आहे. चेहेडीतील स्थानिकांच्या संवादातून पुढे आलेले मुद्दे असे...

‘दारणा’च्या प्रदूषणाचा कळस
चेहेडीकरांच्या शेतीला वरदान ठरलेल्या ‘दारणे’च्या प्रदूषणाचा कळस झाला आहे. त्याबद्दल गाऱ्हाणे मांडूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नाशिक रोड भागातून आलेल्या गटारीच्या पाण्याची गळती होत असून, हे पाणी थेट नदीत पोचत आहे. हे कमी की काय म्हणून दारणेच्या पाण्याच्या प्रवाहासमवेत धूप होणाऱ्या शेतीच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यावर मलनिस्सारण केंद्राचे पाणी थेट दारणात प्रचंड वेगाने मिसळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. वालदेवी नदीचे प्रदूषित पाणी चेहेडी पंपिंग भागात मिसळते. हे पाणी नाशिक रोडकरांसाठी उचलले जाते. याही प्रदूषणाची समस्या निकाली निघायला हवी, अशी इच्छा स्थानिकांची आहे. भूमिगत गटारीची ३४ लाखांची मंजूर झालेली कामे पूर्ण व्हावीत. अंतर्गत चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्यांच्या स्थितीत सुधारणा व्हावी. त्याचबरोबर मळे विभागासाठी मंजूर असलेल्या रस्त्यांची कामे सुरू व्हायला हवीत, अशा मागण्या पुढे आल्या आहेत. मात्र, रस्त्यांच्या कामांसाठी झालेला विरोध स्थानिकांनी एकत्र येऊन मिटवण्याची तितकीच आवश्‍यकता आहे. रस्त्यांच्या प्रश्‍नांवरून विसंवादाच्या पडलेल्या ठिणगीवर उपाय निघताच स्थानिक विकासासाठीचा आग्रह महापालिकेच्या राजीव गांधी भवनापर्यंत धडकल्याशिवाय राहणार नाही हे नक्की! 

महापालिका शाळेचे ‘ब्रॅन्डिंग’
इंग्रजीसह इंटरनॅशनल-ग्लोबल शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे; पण त्यास चेहेडी अपवाद ठरले आहे. महापालिकेच्या शाळेतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल ‘ब्रॅन्डिंग’ करण्यात आले आहे. चेहेडीमधील चौकात डिजिटल फलक झळकतोय. ‘होय, मला सार्थ अभिमान आहे! मी महापालिका शाळेत शिकल्याचा...’ अशा शीषर्काच्या फलकावर महापालिकेच्या सिन्नर फाटा शाळेत शिकलेले नगरसेवक पंडित आवारे यांचे छायाचित्र ठळकपणे आहे. महापालिकेच्या शाळा क्रमांक ७९ च्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांना स्फूर्ती देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा दिमाखात उभा आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळेत गेल्या वर्षी पटसंख्या ७०० होती. त्यात यंदा आणखी ३०० विद्यार्थ्यांची भर पडण्याची अपेक्षा आहे. त्यामागे कारणही तसे आहे. पहिलीपासून सेमी इंग्रजीचे वर्ग असलेल्या शाळेत ई-लर्निंग, डिजिटल आणि ज्ञानरचनावर आधारित वर्ग हे शाळेचे बलस्थान आहेत. ‘एकच ध्यास विद्यार्थी विकास’, ‘तुमची-आमची सर्वांची शाळा’, अशा घोषवाक्‍यांद्वारे प्रवेशासाठी आवाहन करणाऱ्या शाळेप्रति स्थानिकांमध्ये कमालीचा जिव्हाळा आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीतर्फे शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यायला हवे, असा आग्रह आहे. 

ट्रक टर्मिनससाठी आरक्षित असलेले ३५ एकर, क्रीडांगण, व्यापारी संकुलाचे २० एकर क्षेत्र अडकून पडले आहे. त्याचा मोबदला मिळत नाही आणि मातीमोल भावाने जागेची मागणी होते. त्यामुळे आरक्षणाचा उपयोग होत नसलेली जागा स्थानिकांना मिळायला हवी. शेती कायम राहावी, त्यावर आता आरक्षण टाकले जाऊ नये, असाही आग्रह आहे. हे कमी की काय म्हणून पाणी आहे; पण ते केव्हाही ताब्यात घेतले जाईल, अशी शेतकऱ्यांमध्ये असलेली धास्ती कायमची संपुष्टात येणे अपेक्षित आहे.
- पंडित आवारे, नगरसेवक

महापालिकेकडून मागील पंचवार्षिकमध्ये पहिल्या वर्षी खेडी विकास निधीतून सव्वाकोटी मिळाले होते. त्यानंतर चार वर्षे एक पैसाही मिळाला नाही. गावात शंभर वर्षांहून अधिक जुनी शाळेची इमारत आहे. ती पाडून नवीन इमारत व्हायला हवी. महापालिकेच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध व्हावेत.
- शोभा आवारे, माजी नगरसेविका

चेहेडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांची संख्या तीनशे असून, पीक कर्जापोटी एक कोटींचे वाटप व्हायचे. यंदा कर्जासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढून बाकी भरली. त्यासाठी २० टक्के व्याजाने पैसे घेतले आहेत. मात्र, यंदा कर्ज मिळणार की नाही, हे स्पष्ट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 
- संतू पाटील सातपुते, माजी अध्यक्ष, विकास सोसायटी

सर्वे क्रमांक १०३ मधील नदीकाठच्या पूरक्षेत्रातील ४७ एकर जमीन आहे. या जमिनीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबी उपस्थित होऊ नयेत म्हणून नवीन समितीची स्थापना ही काळाची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांची आणि गावकीची जमीन निश्‍चित करण्यातून रखडलेल्या रस्त्याची कामे मार्गी लागण्यास मदत होईल.
- भास्कर पेखळे, शेतकरी

नाशिक-पुणे महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामात गावाच्या प्रवेशद्वारावर बोगदा तयार व्हायला हवा. शेतीमालाच्या विक्रीचा विचार करून बोगद्यातून ट्रक-टेम्पोच्या वाहतुकीचा खोळंबा होऊ नये इतके आकारमान बोगद्याचे  असावे असे वाटते.

- ज्ञानेश्‍वर ताजनपुरे, शेतकरी

काँक्रिटीकरण झाले. वीज, पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेच्या माध्यमातून झाली. शहर आणि गावाचा विचार करून करामध्ये सवलत मिळायला हवी. सुविधा कमी आणि कर अधिक हा असमतोल दूर करावा. वीजपंप लावल्याशिवाय पिण्याचे पाणी न मिळण्याचा प्रश्‍न निकाली काढत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हायला हवा.
- कचरू आवारे, स्थानिक रहिवासी

बागायती क्षेत्रामध्ये मलनिस्सारण केंद्रासाठी आरक्षण टाकण्यात आले. केंद्राचे पाणी थेट दारणा नदीत मिसळते. त्याचप्रमाणे सर्वे क्रमांक १०३ मधील शेताकडे जाण्यासाठी रस्ता व्हायला हवा. पावसाळ्यात गाळ तुडवत शेतात जाण्याचा प्रश्‍न संपुष्टात आणावा. गाळात बुडून दगावणाऱ्या जनावरांची समस्या त्यातून निकाली निघण्यास मदत होईल.
- मच्छिंद्र ताजनपुरे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com