वरुणराजाला संपावर जाण्याचे साकडे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

लखमापूर (ता. बागलाण) - शेतकरी दमदार पाऊस यावा म्हणून होमहवन करून वरुणराजाची प्रार्थना करतात; परंतु धांद्री येथील शेतकऱ्यांनी वरुणराजाला होमहवन करत टाळ-मृदंगाच्या गजरात वरुणराजा बेमुदत संपावर जा, अशी विनवणी केली आहे. सोन्यासारखा शेतमाल पिकवून कवडीमोल विकला जात आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. 

लखमापूर (ता. बागलाण) - शेतकरी दमदार पाऊस यावा म्हणून होमहवन करून वरुणराजाची प्रार्थना करतात; परंतु धांद्री येथील शेतकऱ्यांनी वरुणराजाला होमहवन करत टाळ-मृदंगाच्या गजरात वरुणराजा बेमुदत संपावर जा, अशी विनवणी केली आहे. सोन्यासारखा शेतमाल पिकवून कवडीमोल विकला जात आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न ऐकायला नेत्यांना वेळ नाही. शेतकरी संघटित नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपासाठी येथील शेतकऱ्यांनी सटाणा-मालेगाव मार्गावरील धांद्री फाट्यावर होर्डिंग लावून, पत्रके वाटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजीपाला, फळे, धान्याचे बाजार कवडीमोल झाले आहेत. बाजारभाव किरकोळ बाजारात दुपटीने आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कवडीमोल विकलेल्या मालाचे दोन-दोन महिने पैसे मिळत नाहीत. जिल्हा बॅंकेत स्वत:चे पैसे मिळत नाहीत. कर्ज भरूनही कर्ज मिळत नाही. त्यामुळे ऐन पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर धांद्रीच्या शेतकऱ्यांनी वरुणराजाला बेमुदत संपावर जाण्याची विनवणी होमहवन, भजन करून केली आहे. पाऊस पडला नाही तरी हंगामच लागणार नाही, शेतकऱ्यांचीही शासनाला किंमत कळेल व तोट्यातील शेतीचा तोटाही कमी होण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे मत आहे. 

हा कार्यक्रम सटाणा-मालेगाव मार्गावरील धांद्री भोटापांदी येथे झाला. या वेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, अनिल दळवी, चिंतामण शिरोळे, अशोक शेवाळे, बाळासाहेब चव्हाण, अशोक देवरे, गोविंद देवरे, मुन्ना भामरे, सागर दळवी, बळिराम चव्हाण, पोपट ह्याळीज, संभाजी चव्हाण, घेवर चव्हाण, राजेंद्र शिरोळे, शिवाजी चव्हाण, बाळासाहेब शिरोळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला कर्जमुक्ती देऊन भीक देऊ नका. आम्हाला आमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून योग्य बाजारभाव देण्याची रास्त मागणी आहे. शेतकऱ्याला बॅंकांपासून बाजार समित्यांपर्यंत सर्वच ठिकाणी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. शेतीव्यवसाय बंद करण्याची वेळ या शासनाने आणली आहे.
-चिंतामण शिरोळे, शेतकरी, धांद्री

लाखो रुपये कर्ज काढून सोन्यासारखा शेतमाल पिकवून जर नफा होण्यापेक्षा तोटाच होत असेल तर शेती करणे बंद एवढाच पर्याय राहिला आहे. पाऊस आला तर उद्या तरी योग्य बाजारभाव मिळेल, या भाबड्या आशेने आम्ही शेती पिकवितो. पण पाऊसच आला नाही पाहिजे, यासाठी वरुणराजाला साकडे घातले आहे.
- अशोक शेवाळे, शेतकरी, धांद्री