चिमुकलीसाठी जीवावर उदार मातेची बिबट्याशी झुंज

mendhpal
mendhpal

अंबासन (नाशिक) : तळवाडे भामेर (बागलाण) येथे मध्यरात्रीच्या सुमारास काकू आणि आईजवळ झोपलेल्या साडेतीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने जिवघेणा हल्ला चढविल्याने सदर बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या परिसरातील ही दुसरी घटना असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ताहाराबाद वनविभागाने बिबट्याला जायबंदी करण्यासाठी पिजऱ्यांची व्यवस्था केली आहे. 

काटवन परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्याची दहशत कायम आहे. मागिल काही महिन्यापूर्वी तळवाडे भामेर येथील कोमल नामदेव नामदास या पाच वर्षीय मुलाला बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेऊन ठार केल्याची घटना घडली. यावेळी केद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांनी भेट दिली होती. याच भागात पुन्हा गुरूवारी (ता.31) भीमराव दौलत गायकवाड यांच्या मालकीच्या गोमदर पाड्यालगत असलेल्या गट नंबर 297/1 मध्ये आदल्या दिवशी मेंढपाळ गुलाब गणपत नामदास (रा.तळवाडे भामेर, ता.बागलाण) यांनी मेंढरांचा वाडा बसविला आहे. रात्री संपूर्ण कुटुंबिय झोपी गेले होते. आई गंगुबाई नामदास व काकू लता देविदास नामदास यांच्या मध्यभागी दुर्गा (उर्फ पुजा) गुलाब नामदास (वय 3.5) झोपली होती.

मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक सदर बालिकेने किंचाळली यामुळे आई गंगुबाईस जाग आली. आपल्या मुलीचा जिव धोक्यात असल्याचे पाहून आरडाओरड सुरू केली यामुळे त्यांच्या दोन पाळीव कुत्र्यांनी थेट बिबट्याच्या अंगावर झडप घातली. त्याच क्षणात वडिल गुलाब नामदास हे खडबडून जागे झाले त्यांनीही आरडाओरडा केला. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. तोवर बिबट्याने डोंगराकडे धूम ठोकली होती. साडेतीन वर्षांच्या दुर्गावर डोळ्याजवळ व डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून नामपुर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात प्रथमोपचार करून मालेगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले मात्र बालिकेवर गंभीर जखमा झाल्याने सामान्य रुग्णालयातून धुळे येथे शासकीय रूग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री ताहाराबाद वनपरिक्षेत्र आधिकारी निलेश कांबळे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सर्व कर्मचा-यांना घटनास्थळी रवाना केले होते. सकाळी गोमदर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यावेळी तळवाडे भामेर येथील सरपंच शंकुतंला गायकवाड, उपसरपंच योगेश गायकवाड, जिभाऊ कोर, उपसभापती शितलताई कोर, जिल्हा परिषद सदस्य कन्हू गायकवाड आदिंनी भेटी दिल्या.

पुजीला वाचवा...
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भीमराव गायकवाड यांच्या शेतात आदल्या दिवशी मेंढपाळ गुलाब नामदास यांचा मेंढरांचा वाडा बसला होता. मात्र रात्री काही विपरीत घटना आपल्या कुटुंबियांवर घडेल असे मनातही नसतांना नेहमीप्रमाणे मेंढपाळ नामदास कुटुंबिय वाघुरच्या दोन दिशांना झोपले होते. अचानक साडे बाराच्या सुमारास आईच्या आणि काकूंच्या मध्यभागी झोपलेली चिमुकली दुर्गा किंचाळली असता आई गंगुबाईला खडकण जाग आली. समोरच आपल्या मुलीचा मृत्यू दिसत होता. आई आपल्या पोटाच्या गोळ्याला वाचविण्यासाठी धडपड करीत होती. गंगुबाईने दुर्गा ऊर्फ पुजीचे पाय घट्ट पकडून माझ्या पुजीला वाचवा...माझ्या पुजीला वाचवा...असा आक्रोश करीत होती. पती गुलाब नामदास जागे झाले त्यांनीही आरडाओरडा केली. त्यांनी पाळलेल्या दोन कुत्र्यांनी आपल्या मालकाच्या कुटुंबियांचा जिव धोक्यात असल्याचे पाहून दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातली व बिबट्याच्या तावडीतून दुर्गा ऊर्फ पुजाची सुटका केली.  

या परिसरात नेहमीच हिंस्र प्राण्यांचा वावर असतो.  तसेच गोमदर पाड्यावर आजही वीज, रस्ते पोहचले नाहीत. यासाठी पाठपुरावा केला जाईल. बिबट्याच्या बंदोबस्तसाठी कायमस्वरूपी वाढीव पिंज-यांची मागणीसाठी हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार आहे.
- दिपिकाताई चव्हाण, आमदार बागलाण.

हिंस्र प्राणी नेहमीच जनावरांवर हल्ला करून फडशा पाडतात. यामुळे पशूधन कमी होत चालले आहे. मागिल काही महिन्यापूर्वी याच भागातील कोमल नामदास या बालकाला बिबट्याने ठार केले. पुन्हा चिमुकलीवर हल्ला चढविल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या भागात वीज पोहचली नसल्याने अंधाराचा फायदा घेवून हिंस्र प्राणी हल्ला चढविण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे.
- योगेश गायकवाड, उपसरपंच तळवाडे भामेर.

रात्री भ्रमणध्वनी आल्यावर संपूर्ण कर्मचा-यांना घटनास्थळी रवाना केले. प्रथमतः जखमी बालिकेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. वनविभागाकडून संपूर्ण मदत केली जात आहे. बालिकेची तब्बेतीची वेळोवेळी विचारपुस केली जात तब्बेत धोक्याबाहेर आहे.
- निलेश कांबळे, वनपरिक्षेत्र आधिकारी ताहाराबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com