चाळीसगावला पहिली पोस्टल बॅंक

- अर्जुन परदेशी
रविवार, 5 मार्च 2017

जुलैत सेवा होणार सुरू; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

जुलैत सेवा होणार सुरू; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण
चाळीसगाव - देशभरात लवकरच इंडियन पोस्टल बॅंकांच्या शाखा सुरू होत असून, शासनाच्या "पायलट प्रोजेक्‍ट'मध्ये चाळीसगाव तालुक्‍याचा समावेश आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद विभागातील पहिली पोस्टल बॅंक सुरू करण्याचा मान चाळीसगावला प्राप्त झाला आहे. त्या दृष्टीने या बॅंकेसाठी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून, जुलैत या बॅंकेतून प्रत्यक्ष ग्राहकांना सेवा पुरविली जाईल.

भारतीय टपाल सेवेने बॅंक सेवा सुरू करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेची मान्यता यापूर्वीच मिळवली आहे. पोस्टल बॅंकांतून ग्राहकांना भविष्यात पतपुरवठादेखील केला जाणार आहे. त्यामुळे जनतेत या बॅंकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. जळगाव जिल्ह्यात भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या चाळीसगाव तालुक्‍यात सुरू होणाऱ्या या बॅंकेतून पाचोरा, एरंडोल, कासोदा, भडगाव या तालुक्‍यांला पोस्टल विभागाची अंतर्गत सेवा पुरविली जाणार आहे.

या सेवा होणार उपलब्ध
पोस्टल बॅंकेतून सर्व सामाजिक अनुदानित योजनांचा लाभ ग्राहकांना मिळेल. याशिवाय, संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेसह इतर पेन्शन योजना, बचत व चालू खाते, पैशांचे हस्तांतर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अनुदानाची रक्कम व मजुरीचे वाटप केले जाईल. दिवसभरातून खात्यातून एक लाख रुपयांच्या व्यवहारांची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. सोबतच केंद्र व राज्य सरकारच्या सर्व बिलांचा भरणा, पोस्टल जीवन विमा भरणा केंद्र, अन्न व औषधी सबसिडी व शिष्यवृत्तींचा लाभ पोस्टल बॅंकेतून मिळेल.

इंडियन पोस्टल बॅंकेसाठी जळगाव औरंगाबाद विभागातून चाळीसगाव या एकमेव तालुक्‍याची निवड करण्यात आली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, जुलैत या बॅंकेचा शुभारंभ होईल.
- बी. बी. चव्हाण, जिल्हा टपाल अधीक्षक, जळगाव.

Web Title: first postal bank in chalisgav