मलेशियन नागरिकासह पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

व्हर्च्युअल करन्सीतून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फसवणूक

व्हर्च्युअल करन्सीतून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून फसवणूक
नाशिक - नाशिकमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचे गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आता तारांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना व्हर्च्युअल करन्सीच्या आर्थिक लाभाचे फायदे पटवून देणे आणि त्यातून जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांसह पाच जणांच्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

बिट कॉईन ही व्हर्च्युअल करन्सी भारतामध्ये कायदेशीररीत्या अधिकृत नाही, असे असतानाही संशयित रोमजी बिन अहमद (47, रा. जलान इदाह-2, तमन सेताजी इदाह 08000, सुनगाई पेतानी, केदाह, मलेशिया) या परदेशी नागरिकासह निशेद महादेवजी वासनिक (29, रा. वसिम प्राईड सोसायटी, आराधनानगर, दिघोरी, खर्बी रोड, नागपूर), आशिष शंकर शहारे (28, रा. गोरावती रेसिडेन्सी, कोपरगाव, जि. नगर), दिलीप प्रेमदास बनसोड (29, रा. फाळके प्राइड अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, नाशिक), कुलदीप लखू देसले (38, रा. सुरेश बापू प्लाझा, खुटवडनगर, नाशिक) यांना फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केली आहे तर www.futurebit.com, आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांनी गेल्या काही महिन्यांपासून पाथर्डी फाटा येथील गेट वे हॉटेल, हॉटेल बारबेक्‍ल्यू व्हिले यासह अन्य तारांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेतले. या वेळी त्यांनी मल्टिलेव्हल मार्केटिंग पद्धतीने सेमिनारमध्ये सहभागी झालेल्यांना बिट कॉईन ही व्हर्च्युअल करन्सी खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जादा परतावा व कमिशनचे आमिष दाखविले. बिट कॉईन खरेदीसाठी प्रवृत्त करून त्यांची आर्थिक फसवणूक केली.

सायबर पोलिसांच्या पथकाने सदरच्या सेमिनारवर छापा टाकून 84 हजार रुपयांचे मोबाईल्स, 72 हजार रुपये किमतीचे बिट कॉईन्सचे लोगो, 22 हजार रुपयांची रोकड आदींसह साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व चिटस्‌ ऍण्ड मनी सर्क्‍युलेशन स्किम्स (बॅनिंग) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अटक करण्यात आलेल्या संशयितांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: five arrested with malesian people