झटापट करून चार दरोडेखोरांना शस्त्रांसह पकडले

झटापट करून चार दरोडेखोरांना शस्त्रांसह पकडले

जळगाव - तांबापुरातील अट्टल घरफोड्या सलमानच्या गॅंगने मध्यरात्री तांबापुरातून रिक्षा चोरली, किराणा दुकान फोडले, नंतर दोन पानटपऱ्या फोडून आता मोठा हात मारावा म्हणून दरोड्याच्या तयारीत असतानाच औद्योगिक वसाहत पोलिसांच्या गस्तीपथकाने या गॅंगवर झडप घातली. शस्त्रांसह पोलिसांशी दोन हात केल्यावर चौघांच्या मुसक्‍या आवळल्या, तर एक चोरटा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरला. 


औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या माहितीनुसार रात्री सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, रामकृष्ण पाटील, नितीन बाविस्कर, मनोज सुरवाडे, शशिकांत पाटील, विजय पाटील, प्रकाश पाटील, रत्नाकर झांबरे,अशोक भजना आदींचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी गस्तीवर होते. कुराडेंच्या माहितीचा माग घेत असताना सर्वांनी एकत्रित येत औद्योगिक वसाहत परिसरातील गुरांच्या बाजाराजवळ रात्री तीनला ऑटोरिक्षा (एमएच 19- व्ही 5747) अडविली. रिक्षातील संशयितांनी सुरवातीला चहा पिण्यासाठी गाडी काढल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. अंधारात मात्र अट्टल गुन्हेगार सलमानवर नजर पडताच पथक हबकले व त्याला बाहेर ओढत काढल्यावर रिक्षातील पाचही संशयितांनी पोलिसांवर हल्ला करत झटापट केली, कोयत्याने हल्ल्याच्या तयारीत असतानाच सलमानला कवेत धरले.

दरोड्याचा होता बेत
रात्री तीनला ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये सलमान बाबू पटेल (वय 24), टिपू सलीम शेख (वय 23), इरफान शेख गुलाब (वय 20), शेख तौसिफ शेख रियाजोद्दीन (वय 22, सर्व रा. तांबापुरा- मेहरुण) यांचा समावेश आहे. अटकेतील सलमान अट्टल घरफोड्या असून, त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. सलमानच्या गॅंगने सलग सुट्यांचा गैरफायदा घेत रात्री परिसरातील असलम काकर याची रिक्षा चोरली. तेथून एक किराणा दुकान फोडल्यावर 70 ते 80 हजारांचा माल वाहून नेत एका ठिकाणी दडवला, पुन्हा ममता हॉस्पिटलशेजारी पानटपरी फोडली, नंतर काशिनाथ लॉज चौकात दुसरी टपरी फोडल्यानंतर मोठा हात मारण्याच्या तयारीत तिघेही शस्त्रास्त्रांसह सज्ज होत निघाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी झडप घातली. संशयिताकडे जवळपास दीड ते पावणेदोन लाखाचा ऐवज सापडला आहे.

दरोड्याचे साहित्य जप्त
चौघांकडून पोलिस पथकाने कोयता, एअरगन (छऱ्यांची बंदूक), नायलॉन दोरी, दोन तिखटपूड याच्यासह टपरीतून चोरी केलेले साहित्य मिळून आले असून, चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयितांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात. न्या. बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड. अशा शर्मा यांनी कामकाज पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com