गडाख परिवाराचा उद्या सिन्नरला राज्यस्तरीय मेळावा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मेळाव्यात गुणवंत गडाखांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहेत. पूर्वी राजेशाही कालखंडात गडाची आखणी करण्याची कामगिरी करणारे ते गडाख. राजस्थानातील हंबीरगड येथून 1193 मध्ये हैबतराव गडाख सोनई येथे आले.

सोनांबे : गडाख परिवाराचा राज्यस्तरीय मेळावा बुधवारी (ता. 10) सिन्नर येथील ज्वालामाता लॉन्स येथे होणार आहे, अशी माहिती संयोजक अनिल गडाख यांनी दिली. खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माजी खासदार तुकाराम गडाख, आमदार शंकर गडाख, माजी आमदार सूर्यभान गडाख, उद्योजक योगेश गडाख प्रमुख पाहुणे राहतील.

"साद घालून मनामनाला रक्त बोलावतेय रक्ताला' हे ब्रीदवाक्‍य घेऊन मेळावा होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गडाखांचे कार्य व कार्यक्षेत्र वेगळे असले तरी सर्वांच्या नसांत वाहणारे रक्त यानिमित्ताने साडेआठशे वर्षांनंतर एकत्र येत आहे. या मेळाव्यात गुणवंत गडाखांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहेत. पूर्वी राजेशाही कालखंडात गडाची आखणी करण्याची कामगिरी करणारे ते गडाख. राजस्थानातील हंबीरगड येथून 1193 मध्ये हैबतराव गडाख सोनई येथे आले.

सोनई येथून 1443 ला पारेगाव, देवपूर, चांदोरी, वांभोरी, सिंदखेड लपाली या पाच ठिकाणी गडाख परिवार गेला. तेथून तो विविध ठिकाणी पसरला. राज्यातील 146 गावांत बहुसंख्येने गडाख परिवाराचे वास्तव्य आहे. गडाख आडनाव केवळ मराठा समाजात असल्याने तेदेखील एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. महाराष्ट्रासह अनेक राज्यात विखुरलेल्या गडाख कुळाचा हा नव्याने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

गडाख परिवाराची काही गावे
देवपूर (सिन्नर), चांदोरी (निफाड), मथुरापाडे (मालेगाव), भिंगार (येवला), मांडवड (नांदगाव), सोनई व पानसवाडी (नेवासा), देवळाली प्रवरा व वाभोरी (राहुरी), हिवरगाव पावसा (संगमनेर), बेलगाव व सुराळे (वैजापूर), सिंदखेड लपाली (बुलडाणा).