सोनगीरला 1931 पासून गणेशोत्सव; दुष्काळ असूनही कार्यकर्त्यांचा उत्साह

एल. बी. चौधरी 
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

त्यावेळी कुंभाराकडून गणपती बनविला जाई व लाकडी स्टूलवर मांडून तीन दिवस व फक्त सायंकाळी आरती केली जाई. इतर कोणताही आरास नव्हता. वाजागाजा न करता विसर्जन केले जाई.

सोनगीर (जिल्हा धुळे) : येथे दुष्काळ असूनही गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. येथे सर्वाधिक  25 गणेश मंडळे असून  गावातील एकही मुख्य चौक मोकळा नाही. प्रत्येक चौकात गणेशोत्सव साजरा होत आहे. तीन मंडळानी पन्नाशी गाठली अाहे. गणेश दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. दरम्यान येथे 1931 मध्ये पहिला गणपती उत्सव साजरा झाला असून तो तीन दिवस चालला असे सांगितले जाते. 

येथे शबरी माता गणेश मंडळ, जय बजरंग मंडळ, वीर भगतसिंग, पाटील समाज नवयुवक मंडळ, मोरया मंडळ, दक्षिणमुखी गणेश मंडळ, नवयुवक मंडळ, जय काकासट मंडळ, जय शिवबा, न्यू गुरुगोविंद, वीर एकलव्य, श्री. गुरुगोविंद, पवनपुत्र मंडळ, श्रीकृपा, संत सावता, राजमाता अहिल्यादेवी, साईनाथ, श्री महादेव, सोनगीर फाटा, युवा सांस्कृतिक मंडळ, हेरंब मंडळ, वीर सावरकर, साईश्रध्दा, शिवशक्ती आदी गणेश मंडळे आहेत. याशिवाय लहान मंडळे सुमारे 30 आहेत. 

मंडळाचा इतिहास -
देश स्वातंत्र करण्याची उर्मी तत्कालीन युवकांमध्ये होती. इंग्रजांचा निषेध करण्यासाठी लहानमोठे कार्यक्रम होत असे. 1931 मध्ये प्रथम डॉ. गे.म.हुंबड, हरी दाजी चौधरी, बळीराम तांबट, गोपाल देशपांडे, मंगा दाजी चौधरी, बळीराम भंडारीव त्यानंतर वालचंद जैन, श्रीरंग पाटील व तत्कालीन काही युवकांनी ग्रामपंचायत मागील मारुती मंदिरालगतच्या घरात गणेशोत्सव साजरा केला होता. त्यापैकी वालचंद जैन वगळता कोणीही हयात नाहीत. त्यावेळी कुंभाराकडून गणपती बनविला जाई व लाकडी स्टूलवर मांडून तीन दिवस व फक्त सायंकाळी आरती केली जाई. इतर कोणताही आरास नव्हता. वाजागाजा न करता विसर्जन केले जाई. गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश इंग्रजांविरुध्द जनमत एकत्र करणे हा होता. हळूहळू युवकांची संख्या वाढत गेली. अनेक वर्षे सातत्याने गणेशोत्सव साजरा केल्या नंतर 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर उत्सव बंद पडला. त्यानंतर साधारणतः 1960 पासून हेरंब गणेश मंडळांने उत्सव साजरा सुरू केला. 1965 पासून प्रथम घरगुती स्वरुपात व नंतर सार्वजनिक स्वरूपात युवा गणेश मंडळांने तांबट आळीत गणेशोत्सव साजरा केला तो आजतागायत सुरू आहे. यामंडळांना पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवशक्ती मंडळाने यंदा पन्नास वर्षांत पदार्पण केले आहे.  

पाऊस नसला तरी मंडळांचा उत्साह कायम आहे.मात्र यंदा मंडळांकडे अपेक्षित वर्गणी न जमल्याने बहूतांश मोठ्या कार्यक्रमांना फाटा देण्यात येत आहे. बहूतेक मंडळांनी गावातून वर्गणी गोळा करण्याचे टाळले. मंडळाच्या सदस्यांकडून जमलेल्या निधीवरच यंदा गणेशोत्सव साजरा करीत आहेत. भव्य गणेशमूर्ती व आकर्षक विद्यूत रोषणाईने गाव झगमगले आहे. मंडळाकडून रात्री विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.