मुलींमुळेच भारतीय सणांना महत्त्व

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

जळगाव - भारतीय संस्कृतीत असलेले विविध सणांचे महत्त्व महिला व मुलींमुळेच अधिक वाटते. मुलगी म्हणजे चैतन्य, कुठल्याही सणात त्या हिरिरीने सहभाग नोंदवत असल्याने उत्साहाच्या वातावरणात सण साजरे केले जातात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुलींबद्दल भावना व्यक्त केल्या. 

जळगाव - भारतीय संस्कृतीत असलेले विविध सणांचे महत्त्व महिला व मुलींमुळेच अधिक वाटते. मुलगी म्हणजे चैतन्य, कुठल्याही सणात त्या हिरिरीने सहभाग नोंदवत असल्याने उत्साहाच्या वातावरणात सण साजरे केले जातात, अशा शब्दांत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मुलींबद्दल भावना व्यक्त केल्या. 

सध्या राबविल्या जात असलेल्या कन्या सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा नियोजन भवनात राखी बनवा स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या विद्यार्थ्यांशी हितगूज करताना बोलत होत्या. यात शहरातील नऊ विद्यालयांमधील 160 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपवनसंरक्षक एम. आदर्शकुमार रेड्डी, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी. जी. पाटील, उपशिक्षणाधिकारी डी. एम. देवांग, जिल्हा सरकारी वकील ऍड. केतन ढाके उपस्थित होते. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपापल्या संकल्पना वापरून अतिशय सुंदर व संदेश देणाऱ्या राख्या बनविल्या. मोक्षदा पाटील म्हणाल्या, की भावाने बहिणीचे रक्षण करावे, यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असला, तरी संरक्षणाची ही संकल्पना आज बदलली असून, बहीणही भावाची रक्षा करू शकते. मुला-मुलीत भेद न करता समानतेच्या भावनेने सण साजरे करावेत.

स्पर्धेचा निकाल असा
स्पर्धेत प. नं. लुंकड विद्यालयाची नेहा बाबूलाल पाटील- प्रथम, नंदिनीबाई विद्यालयाची स्नेहल सुनील रडे- द्वितीय, शानबागचा रितेश उल्हास जावळे- तृतीय, तर प. न. लुंकड विद्यालयाची राजश्री विकास चौधरी, शानबागची अंसिका वीरेंद्रसिंग राजपूत व आर. आर. विद्यालयाची साक्षी विजय लाठी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. परीक्षक म्हणून इकरा उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. हारून शेख, बोरनारचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील, मुंदडा विद्यालयाचे उपशिक्षक बी. बी. बाविस्कर यांनी काम पाहिले. माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले.