बंदी नावालाच, गुटखा विक्री जोमात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

जळगाव - शासनाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखाबंदीचा कायदा केला असला, तरी ही बंदी नावालाच असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. जळगाव जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेरसह जळगाव शहर हे गुटख्याचा माल आवक व विक्रीचे मोठे केंद्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये याविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असली, तरी गुटखा विक्रीवर किंचितही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर.

जळगाव - शासनाने राज्यात गेल्या काही वर्षांपासून गुटखाबंदीचा कायदा केला असला, तरी ही बंदी नावालाच असून, ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र लपून राहिलेले नाही. जळगाव जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेरसह जळगाव शहर हे गुटख्याचा माल आवक व विक्रीचे मोठे केंद्र आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये याविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असली, तरी गुटखा विक्रीवर किंचितही फरक पडलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी साधारण सहा-सात वर्षांपूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतला, तसे आदेशही शासनस्तरावर काढण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी अर्थातच अन्न व औषध प्रशासन विभागावर आली. पोलिस यंत्रणेचाही यात सहभाग असला, तरी तो त्या-त्या वेळचे गुन्हे दाखल करून घेण्यापुरता. प्रमुख जबाबदारी ही अन्न-औषध प्रशासनावरच आहे. 

अमळनेर, चाळीसगाव उलाढालीचे प्रमुख केंद्र
बंदी कागदावरच!

राज्यात गुटखाबंदी असली तरी ती केवळ कागदावरच आहे, असे चित्र दिसून येते. मिनरल पाणी मिळणार नाही, पण गुटखा मिळेल अशी अनेक दुकाने, पानटपऱ्या गल्लोगल्ली आहेत. बंदीचा निर्णय होण्यापूर्वी गुटखा उघडपणे ‘डिस्प्ले’ करुन विकला जायचा, आता तो छुप्या पद्धतीने मात्र सर्रास विकला जातो, एवढाच काय तो फरक. कोणत्याही पानटपरीवर उभे राहून गुटख्याचा कोणताही ब्रॅण्ड मागितला तर पानटपरीचालक ‘पुडी’ कुठून काढतो हे लक्षात येण्याआधीच ग्राहकाच्या हातात गुटख्याची पुडी असते. 

संभ्रम निर्माण करणारा व्यवहार
बंदी असूनही गुटखा नेमका कोठून येतो, हा माल कुठे उतरविला जातो, त्याचे डीलर-डिस्ट्रीब्युटर कोण, ठोक स्वरुपात येणाऱ्या मालाची विक्री कशी होते, त्याचे पानटपऱ्यांपर्यंत व छोट्या-मोठ्या ठेल्यांपर्यंत वितरण कसे होते, ही यंत्रणा कमालीची गुप्त व संभ्रम निर्माण करणारी आहे. जिल्ह्यात गुटख्याच्या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होते, मात्र हा व्यवहार नेमका कसा चालतो याबाबत कमालीचा संभ्रम आहे. या व्यवहाराच्या मुळशी ठरवूनही शासकीय यंत्रणा पोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

महिन्याला तीन-चार छापे
अन्न-औषध प्रशासनाने गेल्या काही महिन्यांमध्ये गुटख्याचा माल जप्त करुन तो नष्ट करण्याच्या कारवाईवर भर दिला आहे. गुप्त माहितगाराकडून प्राप्त माहितीच्या आधारे कारवाई केली जाते. महिन्याला सरासरी तीन-चार ठिकाणी छापे टाकले जातात. पक्की माहिती मिळाल्याशिवाय कारवाई होत नाही, त्यामुळे कारवाईच्या संदर्भातही कमालीची गुप्तता पाळली जाते. मात्र, प्रशासनाची कारवाई केवळ दाखविण्यापुरती असते, असेही बोलले जाते. गेल्या वर्षभरात सर्वाधिक चारवेळा चाळीसगाव शहरात गुटखा जप्तीची कारवाई करण्यात आली. 

चाळीसगाव, अमळनेर केंद्र
जळगाव शहराच्या ठिकाणी प्रशासन अधिक सतर्क असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणापासून लांब असलेल्या चाळीसगाव, अमळनेर आदी शहरं गुटखाविक्रीचे प्रमुख केंद्र बनले आहेत. सर्वाधिक माल चाळीसगावात उतरतो, त्याखालोखाल अमळनेर व जळगाव तसेच चोपड्यालाही मोठ्या प्रमाणात माल येतो. या प्रमुख केंद्रावरुनच जिल्ह्याच्या इतर भागात गुटख्याचे वितरण पद्धतशीरपणे होत असते. 

तरुणवर्ग गुटख्याच्या आहारी
गुटख्यालाच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानालाही बंद असताना सर्रास धूम्रपान होते, हेदेखील लपून राहिलेले नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक जागी, रस्त्यावर, व्यापारी संकुलांमध्ये चार-चौघे गुटखा केवळ खातच नाही, तर एकमेकांमध्ये उघडपणे ‘शेअर’ही करतात. गुटखा सहजपणे मिळत असल्याने या व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना तर गुटखा विक्रीवर बंदी आहे, हेदेखील माहीत नाही. याबाबत त्यांना छेडले असता, ‘विक्रीवर बंदी आहे, खाण्यावर आहे का?’ असा प्रतिप्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. तरुणवर्ग या व्यसनाच्या सर्वाधिक आहारी गेल्याचे चित्र दिसून येते.

परिणामांकडे तरुणाईचे दुर्लक्ष
गुटख्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे तरुणवर्गाने दुर्लक्ष केले आहे. गुटखा खाल्ल्याने घसा, तोंडाचा कर्करोग होण्याची शक्‍यता बळावते. त्याशिवाय, फुफ्फुस व यकृतही निकामी होण्याची शक्‍यता असते. गुटख्यामुळे अनेकांना कर्करोग होऊन त्यांचा बळी गेल्याची उदाहरणे आहेत.

Web Title: gutkha sailing in jalgav