महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला तिसऱ्यांदा ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जुलै 2016

दोन टप्पे करूनही निविदांना प्रतिसाद नाही; मुदत वाढविली
जळगाव - तीन वर्षांपासून रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा रखडले आहे. अमरावती-नवापूर मार्गाच्या तीन टप्प्यांतील जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या अंतराचे दोन टप्पे केल्यानंतरही मक्तेदारांनी काही त्रुटी सरकारपुढे मांडत विहित मुदतीत निविदा भरलेल्या नाहीत. त्यामुळे या कामाला तिसऱ्यांदा ‘खो’ मिळून निविदांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या अमरावती ते नवापूर टप्प्यातील चौपदरीकरणाच्या कामाला गेल्या तीन वर्षांपासून ग्रहण लागले आहे. या आधी एल ॲन्ड टी कंपनीला या कामाचा मक्ता दिला होता, मात्र मुदतीत भूसंपादन प्रक्रिया न झाल्याने कंपनीने कामाची किंमत वाढवून मागितली व त्यावरून हा मक्ता व त्यासंबंधीचा करार रद्द झाला. त्यानंतर नव्याने निविदा काढण्यात आली, मात्र दोनवेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर या साडेचारशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या मार्गाचे अमरावती ते चिखली, चिखली ते फागणे व फागणे ते नवापूर असे तीन टप्पे करून नव्याने निविदा काढण्यात आल्या. पैकी अमरावती ते चिखली व फागणे ते नवापूर या कामांच्या निविदा मंजूरही झाल्या. मात्र, त्यातील मधल्या, जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या चिखली ते फागणे टप्प्याच्या निविदेची प्रक्रिया चांगलीच रखडली आहे.

हायब्रीड मोडमध्ये रूपांतर
निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने केंद्र सरकारने या कामाचा ‘बीओटी’चा प्रस्ताव रद्द करून त्याचे हायब्रीड मोडमध्ये रूपांतर केले. यामुळे या कामाला ४० टक्के निधी केंद्र सरकारचा राहील. त्यासंबंधी निविदा प्रसिद्ध करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता या टप्प्याचे पुन्हा चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे असे टप्पे करण्यात आले.

मक्तेदारांच्या अडचणी
निविदा दाखल न होण्यामागे मक्तेदारांनी यासंदर्भात काही त्रुटी काढल्याचे वृत्त आहे. काम घेण्याच्या दृष्टीने आवश्‍यक ती माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी मक्तेदार आग्रही आहेत. निविदा भरण्याआधी पूर्ण समाधान झाल्यावरच मक्तेदार निविदा दाखल करतील, असे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला पुन्हा ‘खो’ बसला आहे.