हॉकर्सच्या स्थलांतराचा नियोजनशून्य कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

जळगाव  - मुख्य रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने प्रभावीपणे हॉकर्स स्थलांतराची मोहीम प्रभावीपणे हाती घेतली, नंतर मात्र या मोहिमेचे नियोजनच चुकले असून त्यामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे तर दुसरीकडे हॉकर्सचीही इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. 
जळगाव शहरात सध्या अतिक्रमणाची समस्या कळीचा मुद्दा बनली आहे.

जळगाव  - मुख्य रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने प्रभावीपणे हॉकर्स स्थलांतराची मोहीम प्रभावीपणे हाती घेतली, नंतर मात्र या मोहिमेचे नियोजनच चुकले असून त्यामुळे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे तर दुसरीकडे हॉकर्सचीही इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. 
जळगाव शहरात सध्या अतिक्रमणाची समस्या कळीचा मुद्दा बनली आहे.

काही प्रमुख मार्ग मोकळे करण्याच्या उद्देशाने महापालिकेने वर्षभरापासून अतिक्रमण काढून हॉकर्सच्या स्थलांतराची मोहीम हाती घेतली. याअंतर्गत फ्रूटगल्ली, बळीरामेपठ, सुभाषचौक, गांधी मार्केट ते सुभाषचौकापर्यंतचा रस्ता असे प्रमुख भाग मोकळे करुन तेथील हॉकर्सला पर्यायी जागा देण्यात आली. प्रत्यक्षात हे स्थलांतर शंभर टक्के यशस्वी ठरलेले नाही व त्या ठिकाणांहून हलविण्यात आलेले हॉकर्स वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या, दुकाने थाटू लागली आहेत. 

दुसरीकडे महापालिकेने बहिणाबाई उद्यान व सागर पार्कवरील हॉकर्सला प्रयत्नपूर्वक हटवून त्यांना पर्यायी जागा दिली. मात्र, या दोघाही ठिकाणच्या हॉकर्सचे स्थलांतर थेट महामार्गालगत समांतर रस्त्यांवर केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्याच आठवड्यात या समांतर रस्त्यांवर अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली, त्यामुळे या ठिकाणांहून हे हॉकर्स विस्थापित झाले. 

ख्वाजामियॉ जागेचा पर्याय
दरम्यान, महापालिकेने हॉकर्स व खाद्यपदार्थांच्या गाड्या लावण्यासाठी ख्वाजामियाँ झोपडपट्टीच्या जागेचा नवा पर्याय शोधून काढला आहे, त्याठिकाणची पाहणीदेखील महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी नुकतीच केली. या जागेवर दिवसा भाजीपाला विक्रेते व रात्री खाद्यपदार्थांच्या गाड्या थाटल्या जातील, असा विषय प्रस्तावित आहे. मुळात ही जागा वादग्रस्त आहे. जागेवर व्यापारी संकुलाचे आरक्षण असून संकुल विकसित करण्यासाठी विकासकाशी करार झाल्यानंतर हे प्रकरण आधी शासनाकडे व नंतर उच्च न्यायालयात प्रविष्ट आहे. सद्य:स्थितीत जागेवर हॉकर्सचे स्थलांतर केले आणि या प्रकरणातील निकाल जर विकासकाच्या बाजूने लागला तर तेथील हॉकर्सला पुन्हा हलविण्याची वेळ महापालिकेवर येऊ शकते. त्यामुळे एकूणच हॉकर्सची इकडून तिकडे अशी हेळसांड सुरु आहे. दुर्दैवाने महापालिकेचे हॉकर्स स्थलांतराबाबतचे धोरण स्पष्ट नाही, अशी तक्रार आता हॉकर्स करु लागले आहेत. 

हॉकर्स स्थलांतराच्या बाबतीत महापालिका प्रशासन गंभीर आहे. हॉकर्सला पर्यायी चांगल्या व सोईच्या जागेवर बसविण्यात येईल, त्याठिकाणी सुविधा देण्यासाठीही मनपा कटिबद्ध आहे. ख्वाजामियाँ झोपडपट्टीची जागा पर्याय होऊ शकते, म्हणून या जागेची पाहणी करण्यात आली. हॉकर्सला कायमस्वरुपी एकच जागा निश्‍चित करुन द्यावी, अशी तरतूद कायद्यात नाही. त्यामुळे कोणत्याही जागेबाबत काही वाद, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर त्या ठिकाणांहून हॉकर्सला पुन्हा हटविले जाऊ शकते. 
- जीवन सोनवणे, आयुक्त, महापालिका.