बीपीएल लाभार्थ्यांची गोड साखर झाली कडू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

इगतपुरी - पुरवठा विभागाच्या कारभारात पारदर्शीपणा आणत असतानाच आता केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना रास्त भाव दुकानातून मिळणारी साखर बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र, त्याचाही दर साडेसहा रुपयांनी वाढविण्यात आला असून, प्रतिकुटुंब फक्त एकच किलो साखरेवरच या कुटुंबांना दिवाळीचा गोडवा साजरा करावा लागणार आहे.

केंद्राकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते; परंतु आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच हे अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले आहे. त्यामुळे यापुढे दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना रास्त भाव दुकानातून साखर मिळणार नाही. नाशिक जिल्ह्यात 2 लाख 90 हजार बीपीएल कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

अंत्योदय योजनेतील कुटुंबांना आता प्रतिकिलो साखरेसाठी 13 रुपये 50 पैसेऐवजी 20 रुपये मोजावे लागणार आहेत. खुल्या बाजारात सध्या साखरेचे भाव 40 ते 45 रुपये प्रतिकिलो असून, त्यामुळे गरीब कुटुंबांना 20 रुपये दराने साखर खरेदी करणे परवडणारे नाही. पूर्वी दरमहा प्रतिव्यक्ती 500 ग्रॅम साखर मिळत होती. त्यातही कपात केली आहे. आता एका कुटुंबाला एका महिन्याला फक्त एक किलो साखर दिली जाणार आहे.