संधिवात, आमवात वेगाने पसरतोय 

गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

जळगाव - कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतरा जणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. 

जळगाव - कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग यांसारख्या आजारांबरोबरच संधिवातदेखील भारतात वेगाने वाढत आहे. सततची धावपळ, बैठे काम, व्यायामाचा अभाव यामुळे संधिवात वाढत आहे. शंभरमध्ये सतरा जणांना संधिवाताने जखडले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आढळते. 

धकाधकीच्या जीवनात बदललेले राहणीमान, कार्यपद्धती यामुळे संधिवाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजारात सांधे आणि त्यांच्याशी संबंधित स्नायू, अस्थिबंध यांना आजार होतात. संधिवात हा दुर्धर आजार मानला जातो, परंतु तो आजार नसून लक्षण आहे. त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. वेळेत इलाज घेतले जात नसल्याने गुडघेदुखीत वाढ होते. मुळात सांधे दुखणे दोन प्रकारात मोडते. "ऑर्थायरिझ' म्हणजे सांध्यांना सूज येणे आणि त्यामुळे शंभर प्रकाराचे वात उद्‌भवतात. यातील संधिवात आणि आमवात हे प्रमुख आजार असल्याचे "नॉर्दन जॉईंट रिप्लेसमेंट'चे डॉ. मनीष चौधरी यांनी सांगितले. 

महिलांमध्ये अधिक प्रमाण 
संधिवात साधारणतः पन्नाशी उलटलेल्यांना होतो. देशातील हे प्रमाण 17 टक्‍के असून, त्यात महिलांमध्ये प्रमाण अधिक आहे. याला कारण, आपल्याकडील समाजव्यवस्था व रूढी-परंपरा. महिला जमिनीवर बसून काम करतात. वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्यात या आजाराचे प्रमाण जास्त आहे. संधिवाताकडे दुर्लक्ष केल्याने बहुतेक रुग्णांना उर्वरित आयुष्य अपंगांसारखे काढावे लागते. 

युवा पिढीत वाढतोय आमवात 
शरीरातील सांध्यामध्ये दुखणे येणे म्हणजे संधिवात असतो. यातीलच आमवात हा प्रकार असून, तो रक्‍तातून उद्‌भवतो. संधिवातामध्ये प्रामुख्याने पायाचे गुडघे दुखतात. परंतु, आमवात रक्‍तातून होत असल्याने तो शरीरातील प्रत्येक सांध्यापर्यंत पोचत असल्याने सर्व शरीराला दुखणे लागते. सुरवातीला लहान जॉईंट म्हणजे बोटांच्या सांध्यापासून त्याची सुरवात होते. आमवाताचे प्रमाण युवा पिढीमध्ये म्हणजे तिशीनंतर येत असतो. 

संधिवात होण्याची कारणे 
- वार्धक्‍य, सांध्यांना पूर्वायुष्यात झालेली इजा आणि अतिश्रमामुळे झीज 
- बैठी कामे आणि व्यायामाच्या अभावाने आलेली स्थूलता 
- "ड' जीवनसत्त्व मिळू न शकल्याने दुर्बल झालेली हाडे 
- अतिधूम्रपान तसेच कॉफीच्या अतिसेवनाने आमवात वाढतो 

अशी घ्यावी काळजी 
- योग्य पद्धतीने नियमित व्यायाम 
- पोहणे किंवा सायकलिंग करणे 
- उंचीच्या योग्य प्रमाणात वजन राखणे 
- अचूक निदान व योग्य उपायांबाबत जागरूकता 
- लक्षणे आढळताच तज्ज्ञांचा सल्ला व इलाज 

संधीवाताचे लवकर निदान हा त्यातील गुंतागुंत नियंत्रित करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी वाढत्या वयात संधिवाताची नियमित तपासणी करावी. आधुनिक काळातील दर्जेदार औषधांमुळे संधिवात प्रभावीपणे नियंत्रित करता येतो. त्यामुळे संधिवाताच्या रुग्णांमध्ये व्यंग निर्माण होऊन त्याच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम टाळणे शक्‍य होत आहे. 
- डॉ. पराग संचेती, अस्थिरोग तज्ज्ञ, संचेती रुग्णालय, पुणे 

पूर्णपणे बरा होणारा आजार 
अलिकडच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही संधीवात आढळतो. मात्र, साधारणपणे 30 ते 50 वयोगटात दहा टक्के तर पन्नासपेक्षा अधिक वयोगटात या आजाराचे प्रमाण 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आढळते. काही प्रमाणात हा आजार अनुवांशिकही असतो, मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. संधीवात पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. ऍलोपॅथीत त्यावर तात्पुरते उपचार असून, आयुर्वेदात तो समूळ बरा होण्यासाठी उपचार आहेत. 
- डॉ. नीतेश खोंडे, नागपूर