अमळनेर : स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

अमळनेर न्यायालयाचा निकाल; नरवाडे येथील घटना 

अमळनेर : नरवाडे (ता. चोपडा) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी नरवाडे (ता. चोपडा) येथील दयाराम नवलसिंग बारेला याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याला दोन मुली असून लहान मुलगी आपल्या आईसमवेत गेल्याने बारा वर्षीय मोठी मुलगी वडील दयाराम बारेला याच्यासोबत एकटी राहत होती. घटनेच्या सहा महिन्यापूर्वीपासून दयाराम बारेला याने कोयत्याचा धाक दाखवून मुलीवर सतत बलात्कार केला. 6 ऑक्‍टोंबर 2015ला रात्री नऊच्या सुमारास आरोपीने झोपडीतील लाइट बंद करून कोयत्याचा धाक दाखवून रात्रीतून दोन ते तीन वेळा बलात्कार केला. कोणासही न सांगण्याचा धमकीने ही घटना पूर्वीपासूनच मुलीने कोणालाच सांगितली नव्हती.

घटनेच्या दिवशी झालेल्या त्रासामुळे मुलीने संपूर्ण घटना स्वत:ची काकू जानकाबाई नंदू बारेला हीस रडून सांगितली. यावर गावातील सरपंच लीलाबाई भिल व पोलिसपाटील वैशाली धनगर यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्याला फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 च्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कैलास वाघ यांनी आरोपीस 7 ऑक्‍टोबरला अटक केली. अमळनेर येथील न्यायालयात पीडित मुलीसह गावातील सरपंच, पोलिसपाटील, डॉ. स्नेहल भामरे, डॉ. पंकज पाटील व तपास अधिकारी यांच्यासह दहा साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीला जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पाच हजार रुपयांचा दंड देण्यात आला. सरकारी पक्षातर्फे ऍड. किशोर बागूल (मंगरुळकर) यांनी काम पाहिले.