नोटाबंदीचे श्राद्ध... महिला रडल्या, पुरुषांनी केले पिंडदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

जळगाव - नोटाबंदीला वर्ष पूर्ण होऊनही अर्थव्यवस्था ढासळलेली असल्याने शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्राद्ध घालण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी रडून गहिवर घातला, तर पुरुष कार्यकर्त्यांनी मुंडन करून पिंडदान केले.

जळगाव - नोटाबंदीला वर्ष पूर्ण होऊनही अर्थव्यवस्था ढासळलेली असल्याने शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्राद्ध घालण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी रडून गहिवर घातला, तर पुरुष कार्यकर्त्यांनी मुंडन करून पिंडदान केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी पिंडदान केले तर कार्यकर्त्यांनी मुंडन केले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, युवती आघाडीच्या कल्पिता पाटील, सविता बोरसे, प्रतिभा शिरसाट यांसह महिला कार्यकर्त्यांनी रडून गहिवर घातला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विकास पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका काँग्रेसतर्फेही होमहवन
तालुका काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून ‘काळा दिवस’ पाळण्यात आला. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय वराडे यांनी होमहवन करून हजार व पाचशेच्या नोटांचे श्राद्ध घातले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, युवक उपाध्यक्ष उद्धव वाणी, सरचिटणीस राहुल पाटील, रवींद्र पाटील, अल्पसंख्याक उपाध्यक्ष जाकीर बागवान, सोमनाथ पाटील, भागवत खैरनार, वसंत पोळ, संदीप तायडे आदी उपस्थित होते. 

जिल्हा काँग्रेसतर्फे अंत्ययात्रा
जिल्हा काँग्रेसतर्फे नोटाबंदीला वर्ष पूर्ण झाल्याबाबत अर्थव्यवस्थेची अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनापासून या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला.  जिल्हा महानगर कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी यांनी ‘आगारी’ धरली होती. माजी आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.  जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्थव्यवस्थेचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे धरणे
नोटाबंदीला वर्ष झाल्याबद्दल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दुपारी दोनपर्यंत आंदोलन करण्यात आले, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात लक्ष्मण शिंदे, ज्ञानेश्‍वर पाटील, अरुणा काळे, विनोद सपकाळे, राजू कोळी आदींचा समावेश होता. 

समाजवादी पक्षातर्फे ‘काळा दिवस’
समाजवादी पक्षातर्फेही नोटाबंदीचा निषेध करण्यात आला. ‘काळा दिवस’ पाळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, की नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्यामुळे हा ‘काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येत आहे. महानगराध्यक्ष अशफाक पिंजारी, दानिश अहमद यांनी हे निवेदन दिले आहे.