कचरा पेटवून लाखो नागरिकांच्या जिवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव - शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी, असा शासनाचा नियम असतानाही महापालिका चक्क कचरा पेटवून देत आहे. यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तक्रार करूनही महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता नागरिकांनीच आंदोलनांचा इशारा दिला आहे. शहरात दररोज तब्बल आठ ते दहा टन कचरा गोळा होतो. शासनाच्या नियमाप्रमाणे महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र महापालिकेच्या आधिपत्याखाली सुरू असलेला आव्हाणी शिवारातील घनकचरा प्रकल्पच बंद आहे.

जळगाव - शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी, असा शासनाचा नियम असतानाही महापालिका चक्क कचरा पेटवून देत आहे. यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तक्रार करूनही महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे आता नागरिकांनीच आंदोलनांचा इशारा दिला आहे. शहरात दररोज तब्बल आठ ते दहा टन कचरा गोळा होतो. शासनाच्या नियमाप्रमाणे महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र महापालिकेच्या आधिपत्याखाली सुरू असलेला आव्हाणी शिवारातील घनकचरा प्रकल्पच बंद आहे. त्यामुळे शहरात जमा झालेला कचरा आता याच प्रकल्पाच्या आवारात जमा करण्यात येत आहे.

परिसरातील नागरिकांना त्रास 
कचरा पेटविल्याने होणाऱ्या धुरामुळे परिसरातील लाखो नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोटेनगर, चंदुअण्णानगर, आव्हाणी, आव्हाने, निमखेडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या धुरामुळे त्रास होत आहे. या भागातील काही जण धुरामुळे आजारी पडल्याचे समोर आले आहे. अगोदर दररोज सकाळी या भागात लोक फिरावयास जात होते, परंतु धुरामुळे अधिकच प्रदूषण होत असल्याने सकाळी कोणीही या भागात ‘मॉर्निंग वॉक’ करण्यास येत नाहीत. 

कचरा पेटविला जातोय
प्रकल्प केंद्रांच्या परिसरात जमा झालेल्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची महापालिकेकडे कोणतीही सुविधाच नसल्याने महापालिकेचे कर्मचारी हा कचरा सर्रास पेटवून देत आहेत. कर्मचारी दररोज सकाळ, सायंकाळी येऊन कचरा पेटवीत असतात. त्यामुळे प्रचंड मोठा धूर होऊन प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.

..अन्यथा तीव्र आंदोलन
महापालिकेने या भागातील कचरा पेटविणे त्वरित बंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, महापालिकेच्या महापौरांनी त्वरित लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. 

कचऱ्यामुळे दुर्गंधी
ॲड. कुणाल पवार - मी गेल्या अनेक दिवसांपासून या वस्तीतून ये-जा करतो. येथील कचरा दररोज जाळला जात असल्याने त्याचा धूर परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरतो. या धुरामुळे नागरिकांना श्‍वसनाचे विकार उद्‌भवत आहेत. कचऱ्यामुळे दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना याठिकाणी राहणे कठीण झाले आहे.   

घंडागाड्यांमधून कचरा रस्त्यावर
शेखर बोरसे - मी दररोज सकाळी या रस्त्याने फिरायला जातो. याठिकाणी फिरताना पेटलेल्या कचऱ्याचा धूर इतका पसरलेला असतो की, चालताना श्‍वास घ्यायला देखील त्रास होतो. शहरातील विविध भागांमधून जमा केलेला कचरा घंटागाडीतून याठिकाणी आणला जातो; मात्र कचरा आणताना तो गाडीतून रस्त्यावर पडतो. 

तक्रारी देऊनही दुर्लक्ष
नरेंद्र बाविस्कर - शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा याठिकाणी टाकला जातो. त्यात कचरा पेटवला जात असल्याने तो हवेसोबत रस्त्यावर उडतो. त्या कचऱ्याची घाण हवेसोबत परिसरात दररोज पसरते. त्यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी देऊनही याकडे दुर्लक्ष केले जाते.

वृद्धांना श्‍वसनाचे आजार
मनीषा पाटील - आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात राहत आहोत. आमच्या घरापासून कचरा फॅक्‍टरी ही एक किलोमीटर दूर अंतरावर आहे. मात्र आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते. त्यातच दररोज हा कचरा जाळला जात असल्याने धूर देखील येतो. परिसरातील वृद्धांना या धुरामुळे श्‍वसनाचे आजार उद्‌भवत आहे.

Web Title: jalgaon news Games with people life by burning garbage