वो समझते थे तमाशा होगा, मैने चूप रहके..!

वो समझते थे तमाशा होगा, मैने चूप रहके..!

जळगाव - ‘वो समझते थे तमाशा होगा, मैने चूप रहके बाजी पलट दी’ ही शहरातील खानदेश विकास आघाडीतील नुकताच स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेले नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या फेसबुक वॉलवरील प्रतिक्रिया. या सूचक प्रतिक्रियेमुळे मात्र चाणक्‍यनीतीची खेळी कुणी कुणावर केली, याबाबत आता प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तरीही जळगाव महापालिकेच्या पटलावरून सुरू होणाऱ्या राजकारणात आगामी काळात बुद्धिबळाचे अनेक डाव खेळले जातील व ते चांगलेच रंगतील, हे मात्र निश्‍चित!

माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खानदेश विकास आघाडीत फारसे आलबेल नसल्याचे चित्र दिसत होते, तरीही वर्षभरानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीपर्यंत पदात कोणतेही बदल होणार नाही, असेच संकेत दिले गेले होते. मात्र, अचानकपणे नितीन लढ्ढा यांना महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला अन्‌ तेथूनच जळगावात नवीन राजकीय खेळीची ‘नांदी’ सुरू होणार, हे निश्‍चित झाले. अर्थात आदेश आला असला, तरी सुरेशदादा जैन मुंबईत असल्याने त्याची निश्‍चिती होत नसल्याने लढ्ढांनी पदाचा राजीनामा दिला नाही. मात्र, त्यानंतर आघाडी अंतर्गत वेगात राजकारण झाले अन्‌ जैन मुंबईत असतानाच लढ्ढांना पुन्हा पदाचा राजीनामा देण्याचा आदेश आला आणि त्यांनी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. नवीन महापौर निवडही झाली. या बदलानंतर पुढे उपमहापौर आणि स्थायी समितीच्या सदस्यपदाबाबत आघाडीत चांगलीच सुंदोपसुंदी झाली. अखेर जैन यांनीच त्या पदासाठी नावे निश्‍चित केली. एकीकडे हे होत असतानाच स्वीकृत सदस्य पदातही बदल करण्याचा निर्णय जैन यांनी घेतला अन्‌ स्वीकृत सदस्य कैलास सोनवणे यांना राजीनामा देण्याचा आदेश नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. तसे माध्यमात वृत्तही प्रसिद्ध झाले.

त्यामुळे सोनवणेंनी तत्काळ राजीनामापत्र तयार करून प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना देण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र, निंबाळकर काही कामानिमित्त नाशिकला गेले असल्याने तो राजीनामा महापालिका उपायुक्तांनीही आपल्याला अधिकार नसल्याचे सांगून स्वीकारला नाही. सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गटनेते रमेश जैन यांनी आपल्या कार्यालयात पाचारण केले व राजीनामा देऊ नका, थांबा, असे सांगितले. मात्र, आपण राजीनामा देणारच, असे आपण त्यांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानतंर स्पीडपोस्टाने प्रभारी आयुक्तांना तो पाठविल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कायद्यात ही तरतूद नसल्याने तो स्वीकृत होऊ शकत नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभारी आयुक्त निंबाळकर जळगावात आल्यानंतर सोनवणेंची भेट झाली. मात्र, काय निर्णय झाला हेच समजू शकले नाही. वातावरण शांत झाले; परंतु सोनवणे यांच्या फेसबुक वॉलवर ‘वो समझते थे तमाशा होगा, मैने चूप रहके बाजी पलट दी’ अशा वाक्‍यासह बुद्धिबळाच्या पटाचे आणि त्यांचे स्वतःचे छायाचित्र आहे. त्यांच्या नावाखाली मात्र ‘माजी नगरसेवक’ असा उल्लेख केलेला आहे. आपण राजीनामा देणार नाही, असे सर्वांना वाटले होते. मात्र, राजीनामा देऊन बाजी त्यांच्यावर उलटविली, असे त्यांच्या या ओळीचा अर्थ असला, तरी येत्या वर्षभरानंतर महापालिका निवडणूक आहे. त्यामुळे आगामी काळात चाणक्‍यनीतीच्या या खेळी सुरूच राहणार आहेत. कोण कुणावर बाजी उलटविणार, हे मात्र आगामी काळात दिसून येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com