चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; महिला मजूर जखमी

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

वनविभागाचे दुर्लक्ष...
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांनी वनविभागाला भ्रमणध्वनीद्वारे कळवली. ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांना पाहणीसाठी बोलावले असता त्यांनी टाळाटाळ करत उद्या बघू म्हणून दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : काकळणे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात निंदणीचे काम चालू असताना महिला मजुरांमधील जिजाबाई नाईक यांच्यावर बिबट्याने काल(ता. 15) दुपारी तिनला अचानक हल्ला केला. यात बिबट्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

नंदू सुदाम पाटील यांचे काकळणे(ता. चाळीसगाव) शिवारात शेती आहे. त्यांच्या उसाच्या शेतात 10 महिला मजूर निंदणीचे काम करीत होत्या. त्यातल्या जिजाबाई भिका नाईक(वय 65) यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या पायाला बिबट्याने चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. जिजाबाई यांच्यावर एका खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र, बिबट्याने पुढे जाताच विजय जगन्नाथ पाटील यांच्या शेळीवर हल्ला केला. त्यात बकरी जागीच ठार झाली. अशी माहिती काकळण्याचे पोलिस पाटील मधुकर पाटील यांनी 'सकाळ'ची बोलतांना दिली. 

वनविभागाचे दुर्लक्ष...
बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांनी वनविभागाला भ्रमणध्वनीद्वारे कळवली. ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांना पाहणीसाठी बोलावले असता त्यांनी टाळाटाळ करत उद्या बघू म्हणून दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू...
काही महिन्यांपूर्वी उंबरखेड(ता. चाळीसगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला होता. तर मेहुणबारे व तिरपोळे गावात शेळ्यांवर हल्ला देखील केला होता. काही ग्रामस्थांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगतात.