'त्या' साडेतीनशे मुलांच्या जगण्याची जागवली आशा

'त्या' साडेतीनशे मुलांच्या जगण्याची जागवली आशा
जळगाव : नशिबाचे फासे हे कधी, केव्हा आणि कसे फिरतील, याचा काही भरवसा नाही. मात्र, ते जेव्हा फिरतात, तेव्हा मात्र आयुष्य बदलून टाकतात. अशाच दुर्धर आजाराने नशीब बदलून टाकलेल्या तरुणीने तिच्या आजारावर तर मात केलीच; शिवाय, अशा दुर्धर आजाराने ग्रस्त साडेतीनशे मुलांना दत्तक घेत त्यांचे संगोपन करीत आहे. जीवघेण्या आजारातून सावरत समाजासाठी झटणाऱ्या तरुणीचा हा प्रेरणादायी प्रयत्न समाजासमोर आदर्शच म्हणावे लागेल.

धरणगाव (जि. जळगाव) येथील मनीषा अनिल बागूल या तरुणीने 2005 मध्ये शहरातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. माहेरच्यांनी लग्नानंतर तिच्याशी सर्व संबंध तोडले. लग्नानंतर सुखाचा संसार सुरू असतानाच पतीला दुर्धर आजार असल्याचे मनीषाला समजले. त्याच आजाराची लागण त्यांनाही झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. आपला आजार बाजूला सारून मनीषाने पतीची सेवा केली. मात्र, काही महिन्यांतच पतीचे निधन झाले. सासू- सासऱ्यांनी मनीषाला घरातून हाकलून लावले.

सासर-माहेरातूनही तुटली
सासर- माहेर तुटलेल्या परिस्थितीत रस्त्यावरचे ठोकर खात मनीषाने महिला दक्षता कक्षाचा दरवाजा ठोठावला. माणुसकीच्या नात्याने प्रवीणा जाधव यांनी मनीषाला सहकार्य केले. मात्र, त्यानंतरही मनीषाचा संघर्ष संपला नाही. सासू- सासऱ्यांनी तिच्यामुळेच मुलाला आजार जडल्याचा दावा करीत तिचे जगणे कठीण केले. त्यांनी लावलेला हा डाग सारखा मनाला टोचत असल्याने व या जगात असा प्रसंग कोणावर नको यायला, हा विचार करीत तिने पतीच्या आजाराचे सर्व पुरावे जमा केले व स्वत:ला निर्दोष सिद्ध करीत पहिले यश मिळविले.

आयुष्याच्या वळणावर नवा 'अंकुर'
मनीषाने अंकुर फाउंडेशनच्या माध्यमातून कामाला प्रारंभ केला. सुरवातीला एक कार्यकर्ती म्हणून ती नोकरी करू लागली. या माध्यमातून मनीषाने जिल्ह्यातील दुर्धर आजाराची लढा देणाऱ्या लोकांना एकत्र आणत त्यांना औषधींची सुविधा उपलब्ध करून दिली. 2010 पासून संस्थेत अध्यक्ष म्हणून काम करताना मनीषाने अशा रुग्णांची समर्पितपणे सेवा सुरू केली आहे.

आत्मशक्तीतून प्रतिकारशक्ती!
आपल्याच लोकांनी साथ सोडल्यानंतर मनीषाने महिला दक्षता विभागाच्या प्रवीणा जाधव यांना आपली कथा सांगितली. त्यावेळी त्यांनी मनीषाला मानसिक व आर्थिक आधार देत आत्मशक्ती वाढविली. या आत्मशक्तीतून मनीषाची प्रतिकारशक्ती इतकी वाढली, की आज एकही औषधी न घेता त्या दुर्धर आजारावर मात करीत आपले आयुष्य आनंदाने जगत आहे.

साडेतीनशे मुलांचे संगोपन
अंकुर फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील साडेतीनशे 'एचआयव्ही'बाधित मुलांना दर महिन्याला सकस आहार दिला जातो. यासोबतच या बालकांना औषधी, कपडे, शालेय साहित्याचे वाटपदेखील करण्यात येते, तसेच जिल्ह्यातील सुमारे साडेसहा हजार महिलांनी फाउंडेशनमध्ये नोंदणी केली असून, त्यांना शासनाच्या योजना व मोफत औषधींचा लाभदेखील देण्यात येतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com