पितृछत्र हरविलेल्या मुलीला केले डॉक्‍टर अन्‌ सून; डॉ. सूर्यवंशींचा आदर्श

राजेश सोनवणे
रविवार, 18 जून 2017

जळगाव - घराला ऊर्जा आणि ते चालविणाऱ्या पित्याचे छत्र हरविले की सारे काही उजाड होते. यात घरात कोणी कमविता व्यक्ती नसेल तर परिस्थिती आणखीन बिकट होते. अशीच काहीशी परिस्थिती रोहिणीच्या आयुष्यात आली. अशा परिस्थितीत पिता नाही, पण पित्याची माया देवून तिचे डॉक्‍टरेटचे शिक्षण पूर्ण केले अन्‌ तिलाच सून म्हणून स्वीकारण्याचा एक आदर्श निर्णय डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी निर्माण केला आहे.

जळगाव - घराला ऊर्जा आणि ते चालविणाऱ्या पित्याचे छत्र हरविले की सारे काही उजाड होते. यात घरात कोणी कमविता व्यक्ती नसेल तर परिस्थिती आणखीन बिकट होते. अशीच काहीशी परिस्थिती रोहिणीच्या आयुष्यात आली. अशा परिस्थितीत पिता नाही, पण पित्याची माया देवून तिचे डॉक्‍टरेटचे शिक्षण पूर्ण केले अन्‌ तिलाच सून म्हणून स्वीकारण्याचा एक आदर्श निर्णय डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी निर्माण केला आहे.

पुनखेडा (ता. रावेर) येथील रहिवासी असलेले डॉ. सुरेश पांडुरंग सूर्यवंशी हे आयुर्वेद तज्ज्ञ आहे. पत्नी मीना आणि तीनही मुले असा, पाच जणांचा परिवार. डॉ. सूर्यवंशी हे पाल येथे प्रॅक्‍टिस करतात. तर, कंपनीत काम करून घर चालविण्याचे काम करणारे विजय कोळी यांना रोहिणी ही एकुलती एक मुलगी. रोहिणीचे बारावीचे शिक्षण पूर्ण झाले; बारावीत चांगले गुण असल्याने एमबीबीएसला नंबर लागला. याच दरम्यान डॉ. सूर्यवंशी यांचा मुलगा खुशाल हा एमबीबीएस करत असल्याची माहिती कोळी यांना मिळाल्यानंतर ते रोहिणीचा विवाह खुशालसोबत करण्याचा प्रस्ताव घेऊन डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे गेले. परंतु त्यावेळी लग्न करायचे नसल्याने बोलणी झाली नाही.

रोहिणीची घेतली जबाबदारी
रोहिणीच्या एमबीबीएसचे शिक्षण सुरू असताना तिचे वडील विजय कोळी यांचे 2010 मध्ये हृदयविकाराने निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर शिक्षणाचा खर्च पेलवणार नाही; म्हणून आईने रोहिणीचे शिक्षण बंद करून कामाला लावण्याचा विचार केला, आणि तसे डॉ. सूर्यवंशी यांना देखील सांगितले. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी रोहिणीची संपूर्ण जबाबदारी घेतली. यात अगदी तिचे राहणे, खाणे आणि एमबीबीएसच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डि.जी.ओ (स्त्रीरोग तज्ज्ञ) ला नंबर लागला. या शिक्षणाला सुरवात होण्यापूर्वीच रोहिणीच्या आईचे देखील निधन झाले. यानंतर पूर्णपणे पोरकी झालेल्या रोहिणीला कोणाचाही आधार राहिला नाही. अशात डॉक्‍टर होण्याचे स्वप्न भंगणार हा विचार मनात आला असतानाच सूर्यवंशी यांनी तिला धीर दिला आणि तिचे डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

सून म्हणूनही केला स्वीकार
पितृछत्र हरपल्यानंतर डॉक्‍टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यावरच डॉ. सूर्यवंशी थांबले नाही, तर आपला मुलगा डॉ. खुशाल याच्याशी रोहिणीचा विवाह लावून तिचा सून म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेत समाजात एक आदर्श निर्माण करून दिला. यास घरातून देखील सर्वांनीच सहमती दर्शविली. रोहिणी ही सून नव्हे, तर मुलगी रूपात आमच्या घरात राहणार असल्याची भावना डॉ. सुरेश सूर्यवंशी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

शाही सोहळ्यात रोहिणी- खुशाल विवाहबद्ध
कोळी समाजात एक आदर्श निर्माण करून देणारा शाही सोहळा आज (ता. 17) भुसावळ येथील बालाजी लॉन येथे गोरज मुहूर्तावर थाटात पार पडला. या सोहळ्यात डॉ. खुशाल सूर्यवंशी व डॉ. रोहिणी कोळी हे विवाहबद्ध झाले.