अस्वच्छतेप्रकरणी आयुक्तांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी संकुलात सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य, उकिरडे झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पाहणीतून दिसून आले. त्यानुसार प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापालिका आयुक्त, प्रदूषण बोर्डाचे उपप्रादेशिक संचालक, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व तालुका दुकान निरीक्षकांना नोटीस बजावल्या आहे. 

जळगाव - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी संकुलात सफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य, उकिरडे झाल्याचे उपविभागीय दंडाधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पाहणीतून दिसून आले. त्यानुसार प्रांताधिकारी तथा सहाय्यक उपजिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापालिका आयुक्त, प्रदूषण बोर्डाचे उपप्रादेशिक संचालक, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व तालुका दुकान निरीक्षकांना नोटीस बजावल्या आहे. 

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना गोलाणी मार्केटमध्ये असलेली अस्वच्छतेबाबत शरद जगन्नाथ काळे यांनी तक्रार अर्ज दिला होता. यावरून जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी उपविभागीय दंडाधिकारी जलज शर्मा, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांना मार्केटची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात
या आदेशानुसार प्रांताधिकारी व उपअधीक्षकांनी २४ मेस सायंकाळी गोलाणी मार्केटची पाहणी केली होती. या पाहणीत सर्वत्र जागोजागी साचलेला कचरा, मार्केटमधील अंतर्गत सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे तसेच यावर कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मार्केटमध्ये येणारे नागरिक, गाळेधारक व रहिवासी यांचे आरोग्य धोक्‍यात आल्याचे पाहणीतून समोर आले आहे. 

गुन्हा दाखल का करू नये?
वस्तुस्थिती पाहणीतून नागरिकांचे आरोग्याचे हित लक्षात घेऊन प्रांताधिकारी श्री. शर्मा यांनी गोलाणीतील अस्वच्छतेबाबत अनेक गोष्टीवरून फौजदारी गुन्हा का करू नये, तसेच गोलाणी मार्केटची स्वच्छता करून तसेच नियमित स्वच्छता राहील याबाबत उपाययोजना करून अहवाल देण्याची नोटीस बजावलेली आहे.

८ जूनपर्यंत अहवाल द्या
उपविभागीय दंडाधिकारी श्री शर्मा यांनी बजाविण्यात आलेल्या नोटिशीत गोलाणी मार्केटची स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा तसेच नियमित सफाईबाबत आवश्‍यक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहे. तसेच राबविण्यात आलेल्या उपाययोजना व स्वच्छतेचा अहवाल ८ जून पर्यंत देण्याचा आदेश नोटीस बजाविण्यात आलेल्या विभागांना दिलेला आहे.

गाळेधारकांना ताकीद द्या  
गोलाणीत फुले, भाजीपाला, फळ, मोबाईल विक्रेते, कार्यालय आदी व्यवसाय करणारे व दुकानदारांना मार्केटमध्ये कचराकुंड्यात कचरा टाकण्याची ताकीद देण्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच अन्य जागेवर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचनाही केली आहे. 

साचलेला कचरा धोकादायक
गोलाणी मार्केटच्या अनेक रिकाम्या हॉलमध्ये व मीटररुमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. महिन्याभरात या कचऱ्याला आग लागण्याचा घटना तीन-चारदा घडल्या. त्यामुळे साचलेला कचरा धोकादायक बनत आहे. त्यामुळे हा कचरा साफ करून मार्केटची स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.