पंचायतराज समितीची अमळनेरच्या कामकाजाविषयी नाराजी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पाणीपुरवठा योजनांबाबत माहिती घेतली. कुऱ्हे खुर्द येथे 2007ची पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे. तत्कालीन समितीने 40 टक्के काम करून पैसे काढून घेतले आहेत. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार बदलवून ही योजना पूर्ण केली असून नळजोडणी फक्‍त बाकी आहे. एक महिन्यात पाणी सुरू करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या आहेत

अमळनेर - पंचायत राज समितीच्या सदस्यांनी आज अमळनेर तालुक्‍यास भेट दिली. पंचायत समितीच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्‍त करून ताशेरे ओढले. कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार करून लवकरच पाठविणार असल्याचे समिती सदस्यांनी सांगितले. 

समिती सदस्यांनी आज म्हसले, टाकरखेडा, कुऱ्हे खुर्द आदी गावांना भेटी देऊन कामांची माहिती जाणून घेतली. पाणीपुरवठा योजनांबाबत माहिती घेतली. कुऱ्हे खुर्द येथे 2007ची पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे. तत्कालीन समितीने 40 टक्के काम करून पैसे काढून घेतले आहेत. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार बदलवून ही योजना पूर्ण केली असून नळजोडणी फक्‍त बाकी आहे. एक महिन्यात पाणी सुरू करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या आहेत. टाकरखेडा येथे पाणीटंचाई असल्याने नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविण्याचा सूचना केल्या. त्यांनी प्राथमिक शाळेत जाऊनही कामांची चौकशी केली. अमळनेर येथे पंचायत समितीत विविध कामांचा आढावा घेतला. स्वच्छतेबाबत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. गटविकास अधिकाऱ्यांना वेतन विचारले असता त्यांना वेतनही सांगता आले नाही. पंचायत समितीच्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्‍त करून कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या समितीत आमदार विक्रम काळे, दत्ता सामंत, श्रीकांत देशपांडे, प्रकल्प संचालक विक्रांत बागळे, अशोक पटाईत, डी. जी. तांबोळी, सुनील मोरे, धीरज बोरसे यांचा समावेश आहे