‘बंद’काळात पोलिस दलाचे कसब पणाला

‘बंद’काळात पोलिस दलाचे कसब पणाला

जळगाव - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. ‘बंद’च्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाने मंगळवारी रात्रीपासून चालवलेले प्रयत्न, आंबेडकरी जनतेशी समन्वय आणि जळगावकरांच्या संयमाने किरकोळ घटना वगळता ‘बंद’ तणावपूर्ण शांततेत पार पडला. गोलाणी मार्केटमध्ये महिला कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्यासाठी घेतलेला आक्रमक पवित्रा, दुपारी गणेश कॉलनीत दंतचिकित्सकाच्या दवाखान्यावर झालेल्या दगडफेकीने शांततेला थोडे गालबोट लागले.

जिल्ह्याचे ठिकाण असल्याने शहरात सकाळपासूनच आंबेडकरी जनतेने पायी मोर्चे काढत व्यापाऱ्यांना ‘बंद’चे आवाहन केले. शनिपेठेतील विकी शालिग्राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ‘बाजार बंद’साठी मोर्चा काढण्यात आला. दुपारी बाराला गोलाणी मार्केटमध्ये सकाळी काही दुकाने सुरू होती.

प्रतिभा शिरसाठ, गायत्री सोनवणे, वैशाली झाल्टे, पराग कोचुरे यांनी दुकाने बंदचे आवाहन केले. काही आंदोलनकर्त्यांकडून दुकानाच्या शटरला लाथा मारून रोष व्यक्त करण्यात आला. मात्र, तत्काळ शहर पोलिस ठाण्यातील कुमक दाखल होऊन त्यांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले.

गणेश कॉलनीत नुकसान
ही घटना होत नाही तोवर गणेश कॉलनी परिसरातील दंतचिकित्सक सनी पवार यांच्या ‘ॲक्‍युडेंटल क्‍लिनीक’वर दगडफेक करून दर्शनी भागाचा काच तोडण्यात आला. श्री स्वीटस्‌ ॲण्ड नमकीन दुकानावरही दगडफेक झाली. दोन्ही घटनांत ‘जिल्हापेठ’चे पोलिस तत्काळ पोहोचल्याने तोडफोड करणाऱ्यांनी पळ काढला. 

जिल्ह्यात १६ जण अटकेत
बोदवड येथे झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी गुन्हे दाखल होऊन सहा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, यावलच्या घटनेत अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भुसावळ येथे ११ संशयितांची नावे निष्पन्न होऊन अटकसत्र रात्री सुरू करण्यात आले होते. अमळनेरमध्ये चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चाळीसगावच्या घटनेत दाखल गुन्ह्यात तीन संशयित ताब्यात आहेत. सावद्याच्या घटनेत वेगवेगळ्या मालमत्ता नुकसानीच्या तीन गुन्ह्यांत २५ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूणच संपूर्ण जिल्ह्यात १६ संशयितांना ताब्यात घेण्यात येऊन इतर संशयितांचा शोध सुरू आहे.  

सरसकट पोलिस गणवेशात
कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तासाठी जिल्ह्यातील साडेतीन हजार कर्मचारी, गृहरक्षक दलाचे दीड हजार जवान, उपविभागीय पोलिस अधिकारी, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षकांसह राज्य राखीव दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथक, शीघ्र कृतिदल, कमांडो पथके यांसह सुमारे साडेपाच हजारांवर फोर्स तैनातीला होता. विशेष म्हणजे पोलिस खात्यात असलेला प्रत्येक कर्मचारी, अधिकारी; मग तो कुठल्याही शाखेचा असला तरी तो गणवेशात हातात काठी, डोक्‍यावर हेल्मेटसह तैनात होता. परिणामी मुख्य बाजारपेठांमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

जिल्हाभरात किरकोळ घटना वगळता कुठलीही मोठी दुर्घटना घडल्याचे सायंकाळपर्यंत समोर आले नाही. ‘राज्यव्यापी बंद’च्या हाकेला प्रतिसाद मिळाला; सोबतच जनतेचे सहकार्य, पोलिस दलाने समन्वय आणि एकसूत्रीपणे स्थितीवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. आंदोलनकर्त्यांसह सामान्य नागरिकांचेही ‘बंद’ शांततेत होण्यासाठी सहकार्य मिळाले.
- दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com