"आधार'च्या चुका दुरुस्त होणार टपाल कार्यालयात! 

राजेश सोनवणे
शनिवार, 24 जून 2017

जळगाव - आधार कार्डातील चुका दुरुस्त करण्याबाबत सर्वसामान्य नागरिक संभ्रमात होते. त्यामुळे अनेक जण चुका असलेलेच कार्ड वापरत आहेत. मात्र, आता या चुका दुरुस्तीची सुविधा महिनाभरात टपाल कार्यालयात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह चार केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. यासोबतच आता ग्रामीण भागात पोहोचलेला टपाल विभाग डिजिटल करून त्या माध्यमातूनही जनतेला सोयी-सुविधा देण्याबाबत वाटचाल सुरू झाली आहे. 

केंद्र करणार निश्‍चित 
आधार कार्डातील माहिती "अपडेट' करण्यासाठी टपाल कार्यालय निश्‍चित केले असले, तरी यासाठी केंद्र निश्‍चित करण्यात येणार आहे. राज्यभरातील शंभर टपाल कार्यालयांत आधार कार्ड "अपडेट' करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यात आधार कार्डातील पत्ते, वय, तसेच नाव यात चुका असल्यास त्याबाबतचा पुरावा देऊन त्या दुरुस्त करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यासाठीचे केंद्र निश्‍चित केले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि चाळीसगाव या मुख्य कार्यालयांसह पहिल्या टप्प्यात आणखी तीन ते चार केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. या केंद्रातील कामकाज सुरळीत झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच टपाल कार्यालयांमध्ये आधार कार्ड "अपडेट' करता येणार आहे. 

अपडेटसाठी लागणार 25 रुपये 
आधार कार्ड "अपडेट' करताना नागरिकांना जुन्या आधार कार्डात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई- मेल आयडी अशी माहिती नव्याने "अपडेट' करता येणार आहे. ही माहिती अपडेट करण्यासाठी 25 रुपये आकारण्यात येणार आहेत. 

"आरआयसीटी प्रोजेक्‍ट'अंतर्गत टपाल खाते डिजिटल! 
केंद्र शासनाकडून "आरआयसीटी प्रोजेक्‍ट'अंतर्गत मुख्य टपाल कार्यालयासह ग्रामीण भागातील कार्यालयांची डिजिटल जोडणी करण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 255 शाखा असलेल्या डाकघरांना प्रत्येकी एक "एमएसडी' मशिन दिले जाणार आहे. त्याद्वारे टपाल विभागाचे सर्व कामकाज "पेपरलेस' करीत डिजिटल पद्धतीने होणार आहे. अर्थात, एखाद्या टपालच्या ग्राहकाला पैसे कोणत्याही टपाल कार्यालयातून क्षणार्धात खात्यात टाकता येणार आहेत. चाळीसगाव विभागात या कामाला सुरवात झाली असून, जळगावच्या मुख्य कार्यालयाकडून 27 व 28 जूनला मशिनचे वाटप केले जाणार आहे.