नेत्यांच्या कर्जमाफीचा पुरावा मुंबईत देणार - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

जळगाव - कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात नेते व त्यांच्या नातेवाइकांना कर्जमाफीचा लाभ झाला. त्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी घेतली, या वक्तव्यावर आपण ठाम आहोत. त्याचा कागदोपत्री पुरावा आपण मुंबईत गेल्यावर देऊ, असे मत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

महाजन यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत राज्यात आघाडी सरकारच्या काळात नेते व त्यांच्या नातेवाइकांना चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी झाल्याचा आरोप केला होता. त्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या बंधूंना तब्बल ऐंशी लाख रुपये कर्ज माफ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दिवंगत पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी महाजन यांना आव्हान देत म्हटले होते, की महाजन यांनी केलेला आरोप पुराव्यासह सिद्ध करावा; अन्यथा दिवंगत पाटील यांच्या समाधीजवळ माफी मागावी.

यासंदर्भात महाजन यांना जळगावात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, की राज्यात आघाडी सरकारच्या काळात नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी घेतली, या वक्‍तव्यावर आपण ठाम आहोत. त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. मुंबईत गेल्यावर आपण कागदोपत्री पुराव्यांसह ते सिद्ध करणार आहोत. त्यात आपण सर्वच नेत्यांची नावे जाहीर करू. याशिवाय विदर्भात कुणी गाई, म्हशी चुकीच्या पद्धतीने घेतल्या त्याचीही माहिती देणार आहोत.

ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळावी, यासाठी आता अर्ज भरून घेण्यात आले आहेत. योग्य शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळावी, अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जमाफी होऊन संबंधितांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री