जळगाव : पिलखोडला गोपाळकाल्यानिमित्त रथ मिरवणूक

शिवनंदन बाविस्कर
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

यंदा प्रथमच मिरवणुक लाईव्ह...
​यंदा गोपाळकाल्याची संपुर्ण मिरवणुक 'श्रीकृष्ण लेझीम मंडळ पिलखोड' या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. बाहेरगावी राहणार्या सगळ्यांना हा सोहळा बघता यासाठी मंडळातर्फे हे लाईव्ह करण्यात येणार आहे. 

पिलखोड(ता. चाळीसगाव)  : तालुक्यात विशेष नावलौकिक असलेल्या येथील गोपाळकाल्यानिमित्त आज गावातून ढोल ताशांच्या गजरात सजविलेल्या रथातून श्रीकृष्णाच्या मुर्तीची दहाला श्रीकृष्ण मंदिरापासून मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. तर सोमवारी(ता. 14) रात्री जन्माष्टमीनिमित्त आयोजन केलेला सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.

येथील साजऱ्या होणाऱ्या श्रीकृष्ण जन्मोत्सवाला दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे या उत्सवाचा तालुक्यात विशेष नावलौकिक प्राप्त आहे. श्रीकृष्ण जन्मोत्सवाला नारळी पौर्णीमेपासून सुरुवात होते. यानिमित्त येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात श्रीकृष्णाच्या मुर्तीची स्थापना करून सात दिवस जल्लोष साजरा केला जातो.  गावातील अबालवृद्ध यानिमित्त एकत्र जमतात. येथे तरुणी या टिपरी व गोफ नृत्य सादर करतात. तर तरुण लेझीम खेळतात. शिवाय जुन्या गावात असलेल्या श्रीकृष्ण मंदिरावर विद्युत दिव्यांनी रोषणाई करण्यात आली आहे. हा उत्सव बघण्यासाठी ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना आमंत्रित करतात. दरम्यान रथ सजावटीचे काम सुरु असून त्यासाठी श्रीकृष्ण लेझीम मंडळाचे सहकार्य लाभत आहे. तसेच जन्माष्टमी व गोपाळकाला या उत्सवासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे. शिवाय मिरवणुकीत मेहुणबारे पोलीसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात...
सोमवारी(ता. 14) रात्री जन्माष्टमीनिमित्त आयोजन केलेला सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यात शेतकरी आत्महत्या, सर्जिकल स्ट्राईक, स्त्री भ्रूणहत्या यावर भाष्य करणारे 'जय जवान जय किसान' हे नाटक श्रीकृष्ण लेझीम मंडळातर्फे सादर करण्यात आले. यावेळी हिंदी व मराठी चित्रपट गीतांवर मुलामुलींची नृत्य झाली. तसेच काही चिमुकल्यांकडून मुकनाट्य सादर करण्यात आले.

आज रथ मिरवणूक....
आज गोपाळकाल्यानिमित्त गावातून ढोल ताशांच्या गजरात सजविलेल्या रथातून श्रीकृष्णाच्या मुर्तीची श्रीकृष्ण मंदिरापासून मिरवणूकीला सकाळी दहाला सुरुवात झाली आहे. याप्रसंगी तरुण लेझीम खेळतात तर तरुणी टिपरी नृत्य सादर करतात. मिरवणुकीत ठिकठिकाणी दहिहंड्या फोडल्या जातात. दरवर्षी बावीसहून अधिक दहिहंड्या श्रीकृष्ण लेझीम मंडळातर्फे फोडल्या जातात. शिवाय मिरवणुकीत डांग जिल्ह्यातल्या(गुजरात) गाढवी येथील युवक मंडळ हे लोकनृत्य सादर करणार असून यंदाचे हे विशेष आकर्षण आहे.

यंदा प्रथमच मिरवणुक लाईव्ह...
यंदा गोपाळकाल्याची संपुर्ण मिरवणुक 'श्रीकृष्ण लेझीम मंडळ पिलखोड' या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. बाहेरगावी राहणार्या सगळ्यांना हा सोहळा बघता यासाठी मंडळातर्फे हे लाईव्ह करण्यात येणार आहे.