शाळेत निकृष्ट अन्‌ गुदामात उत्कृष्ट! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

जळगाव - शालेय पोषण आहार शाळेत पुरवठा झालेल्या मालाची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट माल असल्याचे आढळून आले. मात्र, पाळधी येथील गुदामात उत्कृष्ट दर्जाचा माल आढळून आला. जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या पाहणीत पोषण आहाराच्या गौडबंगालातील आश्‍चर्य पाहावयास मिळाले.

जळगाव - शालेय पोषण आहार शाळेत पुरवठा झालेल्या मालाची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट माल असल्याचे आढळून आले. मात्र, पाळधी येथील गुदामात उत्कृष्ट दर्जाचा माल आढळून आला. जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या पाहणीत पोषण आहाराच्या गौडबंगालातील आश्‍चर्य पाहावयास मिळाले.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या श्री साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडिंग कंपनीचा ठेका संपला असताना त्याला शिक्षण विभागाने जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रकार केला आहे. पोषण आहाराच्या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी देखील मुदत संपलेल्या मालाचा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित ठेकेदाराकडून गुदामातील मालाची मुदत संपलेली पाकिटे चांदसर (ता. धरणगाव) रस्त्यावर फेकून दिल्याचा प्रकार घडला होता. असाच प्रकार सध्या घडत असून, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी भुसावळ तालुक्‍यात पुरवठा झालेल्या मालाची तपासणी केली असता किडे आणि निकृष्ट दर्जाचा माल असल्याचे आढळून आले. यानंतर आज (ता. १) पाळधी (ता. धरणगाव) येथील गोडाऊनमधील मालाची पाहणी केली असता तो चांगल्या दर्जाचा असल्याचे आढळले. म्हणजे गुदामामधील माल रातोरात बदलविण्यात आला, की शाळांमध्ये पुरवठा करताना हलक्‍या दर्जाचा माल दुसऱ्या ठिकाणाहून उचलला जात असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

गुदामातून घेतले डाळींचे नमुने
शाळांमध्ये पुरवठा झालेल्या निकृष्ट मालाचे नमुने जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गुदामाची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही. मात्र, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी आज (ता. १) दुपारी शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांच्याकडे येऊन गुदाम तपासणीची मागणी केली. त्यानुसार शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांच्यासह सदस्य पल्लवी सावकारे, नाना महाजन, माधुरी अत्तरदे, गजेंद्र सोनवणे, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी श्री. देवांग हे दुपारी चारला पाळधी (ता. धरणगाव) येथील श्री साई मार्केटिंग ॲण्ड ट्रेडींगच्या पोषण आहार गुदामाच्या पाहणीसाठी गेले. यात तूरडाळ, मूगडाळ, मटकी, वटाणा यासह मिरची पावडर, हळद तपासणी केली असता माल चांगला असल्याचे आढळून आले. तरीदेखील येथून सर्व डाळींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

पाळधी- भुसावळ नऊ दिवसांचा प्रवास
जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी पाळधी येथील गोडाऊनमधून माल उचलला जात असतो. त्यानुसार भुसावळ तालुक्‍यातील शाळांमध्ये पोषण आहाराचा माल २९ जूनला पोहचला आहे. पण, मालाच्या गाडीचा पाळधी- भुसावळ प्रवास नऊ दिवसांचा राहिला आहे. गोडाऊन तपासणी दरम्यान याबाबत पल्लवी सावकारे यांनी मालाची गाडी कधी निघाली याची विचारणा केली असता, गुदाममधून माल घेऊन गाडी २० जूनला निघाल्याची बाबसमोर आली आहे. म्हणजेच २० जूनला निघालेली गाडी माल बदलविण्यासाठी कोठेतरी थांबविण्यात आल्याचा आरोप सावकारे यांनी केला आहे.

साकरी, खंडाळा- मोंडाळा शाळांमध्ये पंचनामे
जिल्हा परिषद सदस्या सावकारे, प्रमोद सावकारे यांनी भुसावळ तालुक्‍यातील दहा शाळांमध्ये पाहणी केली असता, निकृष्ट माल आढळून आला आहे. त्यानुसार आज पल्लवी सावकारे यांच्यासह, गटशिक्षणाधिकारी सुमित्र अहिरे, शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण, नारायण कोळी यांनी तालुक्‍यातील खंडाळा- मोंडाळा व साकरी येथील शाळांमध्ये जाऊन पुरवठा झालेल्या मालाचा पंचनामा करत नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले.