सिंधी बांधवांचा वर्सी महोत्सव सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जळगाव - होमहवन, अखंड पाठ साहेब यांसह विविध धार्मिक विधी करीत आजपासून सिंधी समाजाचे संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब (गोदडीवाले) व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवास सुरवात झाली. यानिमित्त सिंधी समाजाचे देशभरातील संतांचे आगमन झाले आहे. महोत्सवात महिलांची प्रचंड गर्दी आहे.

जळगाव - होमहवन, अखंड पाठ साहेब यांसह विविध धार्मिक विधी करीत आजपासून सिंधी समाजाचे संत कंवरराम साहेब, संत बाबा हरदासराम साहेब (गोदडीवाले) व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या वर्सी महोत्सवास सुरवात झाली. यानिमित्त सिंधी समाजाचे देशभरातील संतांचे आगमन झाले आहे. महोत्सवात महिलांची प्रचंड गर्दी आहे.

संत कंवरराम ट्रस्ट व कंवरनगर पूज्य सिंधी पंचायत यांच्यातर्फे हा वर्सी महोत्सव सुरू झाला. संत कंवरराम यांचा ६०वा तर संत बाबा हरदासराम साहेब यांचा ४० आणि बाबा गेलाराम साहेब यांचा नववा वर्सी महोत्सव आहे. महोत्सवासाठी आज सकाळी संत कंवरराम साहेब यांचे पुत्र साई राजेशकुमार (अमरावती), संत साई चांडूराम साहेब, संत बलराम साहेब (बिलासपूर), देविदास भाई यांचे आगमन झालेले आहे.

पंचामृत स्नान
वर्सी महोत्सवात सकाळी संत बाबा हरदासराम, संत गेलाराम साहेब यांच्या समाधीला पंचामृत स्नान घालण्यात आले. संत कंवरराम, संत बाबा हरदासराम, बाबा गेलाराम यांची आरती होईल. सकाळी दहाला गुरूग्रंथ व धुनी साहेब यांच्या अखंड पाठाला सुरवात झाली. 

सुरक्षा रूमचे उद्‌घाटन
बाहेरगावाहून आलेल्या भाविकांचे मौल्यवान सामान, वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षा रुमचे उद्‌घाटन आज सकाळी झाले. पोलिस मदत केंद्रही सुरू करण्यात आले आहे. देशभरातील अनेक भाविकांचे आज आगमन झाले. उद्याही काही भाविक येतील.

विविध कार्यक्रम
महोत्सवात संत बाबा हरदासराम पटापटी टोली हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. रात्री उल्हासनगर येथील झुलेलाल म्युझिक पार्टी यांनी ऑर्केट्रा सादर केला. अजमेर येथील भगत लेवी, महिला मंडळातर्फे विनोदी नाटक, ‘संतो की महिमा’ याविषयावर नाटक सादर करण्यात आले.

झुल्यांचे आकर्षण
महोत्सवानिमित्त सिंधी कॉलनी परिसरात वेगवेगळ्या प्रकारे दुकाने थाटण्यात आलेली आहेत. आकाशपाळणे, विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने रस्त्याच्या दुतर्फा थाटण्यात आली आहेत. खेळण्यांसह शीतपेये व खाद्यपदार्थांची दुकानेही थाटण्यात आली आहेत. उत्सवाच्या निमित्ताने परिसरात करण्यात आलेली रोषणाई व भाविकांच्या गर्दीने सिंधी कॉलनी परिसर गजबजून गेला आहे.

महोत्सवात आज
महोत्सवात उद्या (९ ऑक्टोबर) सकाळी अकराला झेंडा पूजन होईल. सायंकाळी विजय वाधवा म्युझिक पार्टीतर्फे ऑर्केस्ट्रा, साई बलरामदास यांचे आध्यात्मिक प्रवचन होईल. ‘बाबल प्यारो, जलगाव वारो’ हा कार्यक्रम सादर होईल. १० ऑक्‍टोबरला गुरूग्रंथ साहेब व धुनी साहेब यांचा अखंड भोगाचा कार्यक्रम होऊन ११ ऑक्‍टोबरला पूज्य वर्सी महोत्सवाचा पल्लव साहेब (समारोप) होईल.

दुकाने उद्या बंद
हा महोत्सव म्हणजे देशभरातील सिंधी बांधवांना सेवा करण्याची एक संधी असते. मंगळवारी  (१० ऑक्टोबर) महोत्सवात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. शहरातील सर्व सिंधी बांधव आपली दुकाने बंद करून या महोत्सवात महाप्रसादात सेवा देणार आहेत.