गतवर्षीच्या गोळीबाराच्या घटनेतही विशालच संशयित

जप्त केलेले रिव्हॉल्व्हरसह दोन राउंड.
जप्त केलेले रिव्हॉल्व्हरसह दोन राउंड.

जळगाव - गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून जखमी तरुण झाली झाला. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करून पितळी गोळी काढण्यात आली. संशयित व जखमीच्या अंगावरील कपडे पोलिसांनी जप्त केले असून, अटकेतील संशयिताला आज जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेतील संशयित विशाल अहिरे हा गतवर्षी जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

जुने जळगाव परिसरातील आंबेडकरनगरातील रहिवासी सागर रतन भालेराव (वय २३) गावठी पिस्तुलातील गोळी घशात गेल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून जटील शस्त्रक्रियेनंतर त्याच्या घशात रुतलेली गोळी काढण्यात डॉक्‍टरांना यश आले. जखमी सागरने सांगितल्यानुसार विशाल राजू अहिरे याने जेवणाला बोलावून रिव्हॉल्व्हर ताणले. रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेला व गोळी ओठातून दात पाडून घशात शिरल्याने तिचा वेग आणि दिशा बदलली.

त्यामुळे सागरचा जीव वाचल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, रोहन खंडागळे यांच्या पथकाने मेहरुण येथील रहिवासी विशालला पहाटेच ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले असून, आज त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे ॲड. तडवी, तर बचावपक्षातर्फे इम्रान शेख यांनी कामकाज पाहिले.
 

आणखी संशयित असण्याची शक्‍यता
विशाल हा ‘रेकॉर्ड’वरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या दिवशी (१९ सप्टेंबर) विशालच्या मेहरुण येथील घरी जखमी सागर भालेरावसह आणखी इतर मित्र- साथीदार हजर होते. गुन्ह्यात त्याचा सहभाग तपासण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने संशयितास कोठडी सुनावली आहे.

रिव्हॉल्व्हर सापडल्याचा आव
पोलिस चौकशीत विशालने काढून दिलेले रिव्हॉल्व्हर आणि दोन राउंड गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून, रिव्हॉल्व्हर आपल्याला बाजार समिती आवारात सापडल्याचे तो पोलिसांना सांगत होता. मात्र, यापूर्वीच्या गुन्ह्यांतही त्याचा सहभाग असल्याने रिव्हॉल्व्हर कोठून आणले, याचा पोलिस शोध घेत आहेत.

सागरच्या गोळीबार प्रकरणाला यापूर्वीच्या घटनेची पार्श्‍वभूमी
नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत तरुण जखमी होऊन त्याचा मित्र अटकेत आहे. या घटनेला आंबेडकरनगरात गतवर्षी घडलेल्या गोळीबाराचीही पार्श्‍वभूमी आहे. गोविंदा सोनवणे व चंद्रमणी तायडे घरात बसलेले असताना, पाच ते सहा संशयितांनी (२६ सप्टेंबर २०१६) हल्ला चढवून गोळीबार केला होता. त्यात गोविंदा सोनवणे व चंद्रमणी तायडे जखमी झाले होते. या गुन्ह्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात विशाल अहिरे संशयित म्हणून समोर आला. त्याला अटक करण्यात आली होती. नुकताच तो जामिनावर सुटला असून, त्याने मित्रावरच गोळी झाडली.

आंबेडकरनगरात गतवर्षी झालेल्या गोळीबार प्रकरणात गोविंदा सोनवणे, सतीश गायकवाड या दोघांच्या गटांमध्ये अनेक दिवसांपासून वाद होता. माजी नगरसेवक शालिक सोनवणे यांच्या निधनानंतर आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदावरून दोघांचा वाद विकोपाला जाऊन एकदा तलवार हल्ला, दोन गटांची तुंबळ हाणामारीच्या वेगवेगळ्या चार घटना घडून गुन्हे दाखल झाले. हाच वाद विकोपाला जात असताना गतवर्षी २३ सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या गोळीबार प्रकरणात गोविंदा सोनवणे याच्या तक्रारीवरून सतीश मिलिंद गायकवाड, सचिन दशरथ सैंदाणे, शोभा गायकवाड, लक्ष्मी सैंदाणे, प्रकाश गायकवाड यांच्यासह विशाल राजू अहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करण्यात आली होती.

‘त्या’ गुन्ह्यात रिव्हॉल्व्हर जप्ती नाही  
आंबेडकरनगर गोळीबार प्रकरणात संशयित गायकवाड आणि इतरांना अटक केल्यानंतरही त्यांनी गोळीबारातील रिव्हॉल्व्हर तेव्हा काढून दिले नव्हते. चंद्रमणी तायडे याच्या डोक्‍यामागून शिरलेली गोळी गालात रुतली होती. गोळी काढल्यानंतर पोलिसांनी जप्त केली. मात्र, त्या गोळीचे रिव्हॉल्व्हर संशयितांनी काढूनच दिलेले नसल्याचे समोर आले आहे. मंगळवारी झालेल्या गोळीबारातील जखमी सागरच्या प्रकरणातील ते, जुनेच रिव्हॉल्व्हर तर नाही? याचाही पोलिसांना तपास करावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com